Anderson-Broad : अँडरसन-ब्रॉड जोडीचे 1001 कसोटी बळी, वॉर्न-मॅकग्रा जोडीचा विक्रम मोडीत | पुढारी

Anderson-Broad : अँडरसन-ब्रॉड जोडीचे 1001 कसोटी बळी, वॉर्न-मॅकग्रा जोडीचा विक्रम मोडीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडच्या जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाज जोडीने एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान या गोलंदाज जोडीच्या नावावर 1001 कसोटी बळींची नोंद झाली असून अशी कामगिरी करणारी ही जगातील दुसरी गोलंदाज जोडी ठरली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाची माजी गोलंदाज जोडी ग्लेन मॅकग्रा आणि दिवंगत महान लेग-स्पिनर शेन वॉर्न यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

ब्रॉड आणि अँडरसन या इंग्लिश वेगवान जोडीच्या भेदक मा-या पुढे भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या 5 गोलंदाजांच्या यादीत या दोघा वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. इतर तीन गोलंदाज फिरकीपटू आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात किवी संघ पहिल्या डावात 306 धावा करून सर्वबाद झाला. इंग्लंडच्या 325 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 19 धावांनी मागे पडला. न्यूझीलंडच्या इनिंगमध्ये ब्रॉडने नील वॅगनरची विकेट घेत हा इतिहास रचला. याचबरोबर ब्रॉड-अँडरसनच्या जोडीने 1000 कसोटी विकेट्स आपल्या नावावर करून विक्रम नोंदवला. यानंतर अँडरसनने टॉम ब्लंडेलला बाद करत वॉर्न-मॅकग्रा या जोडीच्या 1001 बळींची बरोबरी केली.

स्टुअर्ट ब्रॉडने आतापर्यंत 160 कसोटी सामन्यांमध्ये 567 बळी घेतले आहेत, तर जेम्स अँडरसनने आतापर्यंत 178 कसोटी सामन्यांच्या 330 डावांमध्ये 678 बळी घेतले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये एकत्र सर्वाधिक विकेट घेणार्‍या जोडी

शेन वॉर्न-ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया): 1001 विकेट (104 सामने)
जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड): 1001 विकेट्स (133 सामने*)
मुथय्या मुरलीधरन-चमिंडा वास : 895 विकेट (95 सामने)
कर्टली अॅम्ब्रोस-कोर्टनी वॉल्श : 762 विकेट (95 सामने)
मिचेल स्टार्क-नॅथन लियॉन : 580 विकेट (73 सामने)
वसीम अक्रम-वकार युनूस (पाकिस्तान) : 559 विकेट (61)

Back to top button