महिला प्रीमियर लीग : महिला क्रिकेटपटूंवर पैशाचा पाऊस! | पुढारी

महिला प्रीमियर लीग : महिला क्रिकेटपटूंवर पैशाचा पाऊस!

मुंबई, वृत्तसंस्था : पहिल्यावहिल्या महिला प्रीमियर लीग 2023 साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडली. पहिल्या सेटमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने सर्वाधिक 3.40 कोटी रुपये घेतले. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आरसीबीने बाजी मारली. हरमनप्रीत वीमेन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार आहे. मुंबईने कौरला 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले. हरमनप्रीतसाठी बोली लावण्याची मोठी फेरी झाली, पण शेवटी मुंबई इंडियन्सला संधी मिळाली.

अ‍ॅश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंटस्ने 3.2 कोटी रुपये मोजले. भारताची लेडी सेहवाग अर्थात शेफाली वर्मा हीसुद्धा कोट्यधीश बनली असून तब्बल दोन कोटी रुपयांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. तिच्या नेतृत्वाखाली भारताने नुकताच अंडर-19 वर्ल्डकप जिंकला होता.

स्मृतीसाठी चढाओढ

स्मृती मानधनाचे पहिले नाव येताच मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी यांनी पॅडल उचलला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांनी बोली लावण्यास सुरुवात केली. 2.60 कोटीपर्यंत दोन्ही फ्रँचाईझींमध्ये चुरस रंगली. स्मृतीने 112 टी-20 सामन्यांत 112 च्या स्ट्राईक रेटने 2651 धावा केल्या आहेत. आरसीबीने 3.40 कोटींत तिला आपल्या ताफ्यात घेतले.

भारताची स्टार महिला खेळाडू आणि व्हाईस कॅप्टन स्मृती मानधना हिची पहिलीच बोली लागली. बंगळूरच्या संघासाठी तिला तब्बल 3.40 कोटींची बोली लागली. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर असलेल्या टीम इंडियाने ड्रेसिंग रूममध्ये एकच जल्लोष केला. याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जेमिमाह दिल्लीकडे

महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करून पाकिस्तानला पराभवाचा धक्का देणार्‍या जेमिमाह रॉड्रिग्जसाठी मुंबई इंडियन्सचे प्रयत्न कमी पडले. 50 लाख मूळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये जेमिमाहचे नाव होते आणि दिल्ली कॅपिटल्सने पहिली बोली लावली. यूपी वॉरियर्सने 1.5 कोटीपर्यंत बोली लावून दिल्लीला तगडी टक्कर दिली होती. त्यानंतर 1.60 कोटी बोली लावून मुंबईने एन्ट्री घेतली. किंमत दोन कोटींच्या वर जाताच मुंबईने माघार घेतली आणि दिल्ली कॅपिटल्सने 2.20 कोटींत तिला आपल्या ताफ्यात घेतले.

इंग्लंडच्या नॅटसाठी कोट्यवधींचा वर्षाव

इंग्लंडच्या नॅट शीव्हर-ब्रंटचे नाव येताच मुंबई इंडियन्सने पहिला पॅडल उचलला. दिल्ली कॅपिटल्स व मुंबई यांच्यात 1.6 कोटींपर्यंत चुरस रंगली. या किमतीत मुंबई इंग्लंडच्या ऑल राऊंडरला आपल्या ताफ्यात घेतील असे वाटत असताना यूपी वॉरियर्स शर्यतीत उतरले. त्यांनी 3 कोटींपर्यंत मुंबईला टफ दिली; परंतु मुंबईला 3.2 कोटींत इंग्लंडच्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यात यश मिळाले. शीव्हर-ब्रंटने 104 टी-20 त 1999 धावा केल्या आहेत आणि 78 विकेटस् घेतल्या आहेत.

दोन्ही संघांचे कर्णधार मुंबई इंडियन्समध्ये (महिला प्रीमियर लीग)

आजच्या लिलावानंतर हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने संघात घेतले आहे. त्यामुळे आता भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचे दोन्ही कर्णधार मुंबई इंडियन्स फ्रँचाईझीमधून खेळणार आहेत. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर पेजने या दोन्ही कर्णधारांचा भारताच्या जर्सीमधील फोटो पोस्ट केला आहे. मुंबईच्या संघाने कौरसाठी एक स्पेशल व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगसाठी ‘आली रे’ हा हॅशटॅग वापरला आहे.

Back to top button