रोहित, विराटबाबत संयम बाळगा : रविचंद्रन अश्विन | पुढारी

रोहित, विराटबाबत संयम बाळगा : रविचंद्रन अश्विन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारताला वर्ल्डकप जिंकून दिलेला नाही, या आक्षेपावर रविचंद्रन अश्विन याने रोहित आणि विराटची पाठराखण केली आहे. तो म्हणाला, तुम्ही हे जिंकले नाही आणि ते जिंकले नाही हे सांगणे खूप सोपे आहे. 1983 च्या विश्वचषकानंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला विश्वचषक जिंकण्यासाठी सहा वर्ल्डकपपर्यंत वाट पाहावी लागली. त्याप्रमाणे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत संयम बाळगण्याचे आवाहन भारताचा वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने केले आहे.

रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सदस्य आहे. आर. अश्विनने नुकतेच त्याच्या यूट्यूब चॅनलवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत संयम बाळगण्यास सांगितले आहे. 2014 टी-20 विश्वचषक आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात जागा मिळवली होती. मात्र, संघाला विजय मिळवता आला नाही. मागील 10 वर्षांत भारताची कामगिरी खराब मानली जाऊ शकत नाही, पण किताबाच्या वनवासामुळे अनेकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना टीकेचा धनी व्हावे लागले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्माने ब्रॉडकास्टरवर टीका केली. ‘कधी कधी योग्य गोष्टीही दाखवल्या पाहिजेत’, असे रोहित म्हणाला. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात रोहितने 1101 दिवसांनी शतक झळकावले. मात्र, रोहित शर्माने युक्तिवाद केला की या कालावधीत तो केवळ 12 एकदिवसीय सामने खेळला आहे. रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 2022 मध्ये टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन बनवू शकला नाही.

Back to top button