अपघातानंतर ऋषभ पंतचे दुसरे ट्विट : “मी नेहमीच तुमचा…” | पुढारी

अपघातानंतर ऋषभ पंतचे दुसरे ट्विट : "मी नेहमीच तुमचा..."

पुढारी ऑनलाईन: भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघातामधून तो थोडक्यात बचावला. गंभीर जखमी झालेल्या पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर तो अद्याप हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दरम्यान, पंतने अपघातातून वाचविणाऱ्या ‘त्या दोघांचा त्यांच्या आईसोबतचा फोटो शेअर करत एक मेसेजही लिहिला आहे. ( Rishab Pant Tweet )

Rishab Pant Tweet : दोन्ही वीरांचे आभार मानतो

ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर रजत कुमार आणि निशू कुमार या दोघांनी ऋषभला रूग्णालयात दाखल केले. यावर त्याने या दोघांचा फोटो शेअर करत आभार मानले आहेत. यामध्ये त्याने म्हटले आहे की, याप्रसंगात मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी वैयक्तिकरित्या कोणाचे आभार मानू शकत नाही; पण मी या दोन्ही वीरांचे आभार मानतो. ज्यांनी मला अपघातादरम्यान मदत केली आणि सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले. मी नेहमीच तुमचा ऋणी राहिन, असेही ऋषभ पंत याने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अपघातानंतर केले ‘हे’ पहिले ट्विट

ऋषभ पंत याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. पंत याने अपघानंतर केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये त्याला दिलेल्या आशिर्वादाबद्दल आणि त्याच्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले होते. माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. पुढील वाटचालीसाठी मी तयार आहे. आगामी आव्हाने माझी वाट पाहत आहेत, असे देखील या पोस्टमधून त्याने म्हटलं होते. तसेच त्‍याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही ( BCCI) आभार मानले होते. (Rishab Pant Tweet)

कारवरील ताबा सुटल्याने दुर्घटना; गंभीर दुखापत

३० डिसेंबर २०२२ रोजी ऋषभचा अपघात झाला. या अपघाताने त्याला खूप गंभीर स्थितीला सामोरे जावे लागले. पहाटेच्या वेळी डुलकी लागल्याने कारवरील ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडली असे त्याने याआधी सांगितले होते. अगदी काही क्षणांमध्ये झालेल्या अपघातात त्याच्या कारचा चक्काचूर झाला होता. या अपघातात त्याच्या कपाळावर दुखापत झाली. तसेच त्याच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटला इजा पोहोचली आहे.

हेही वाचा:

Back to top button