पुढरी ऑनलाईन डेस्क : कार अपघातात जखमी झालेला भारतीय क्रिकेट संघाच्या यष्टीरक्षक ऋषभ पंत याच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय ) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पंतबाबत मोठा खुलासा केला आहे. यंदाच्या 'आयपीएल' हंगाम पंत खेळू शकणार नसल्याचे सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. 'बीसीसीआय' अध्यक्षपदाच्या कार्यकाळ संपल्यानंतर आता गांगुली आयपीएलमधील दिल्ली संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे त्याच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. (Sourav Ganguly on Rishabh Pant)
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाच्या 'डायरेक्टर ऑफ क्रिकेट' या पदाची जबाबदारी सौरव गांगुली यांच्यावर असणार आहे. या पदाची जबाबदारी स्वीकारताच गांगुली यांनी ऋषभ पंतबाबत मोठा खुलासा केला आहे. (Sourav Ganguly on Rishabh Pant) गांगुली यांनी कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना ऋषभबाबत माहिती दिली. ऋषभ पंतकडे यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी होती.
या वेळी गांगुली म्हणाले, " ऋषभ पंत पूर्णपणे फिट होण्यासाठी अजून बराच काळ लागेल. तो अपघातातून सावरत आहे. तो फक्त २३ वर्षांचा आहे. त्याच्याकडे अजून बराच काळ आहे. ऋषभ पंत आयपीएलसाठी उपलब्ध असणार नाही. ऋषभ पंत जखमी झाल्याने दिल्लीच्या संघावर मोठा परिणाम झाला आहे." (Sourav Ganguly on Rishabh Pant)
ऋषभ पंत जखमी झाल्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 आणि वनडे मालिकेसाठी त्याला मुकावे लागले. बीसीसीआयने पंतला बेंगलोर येथील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये जाण्यासाठी सांगितले होते. मात्र, तत्पूर्वीच तो क्रिसमस साजरा करण्यासाठी दुबईला गेला होता. दुबईत पंतने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी समवेत क्रिसमस साजरा केला. दरम्यान, तो दुबईतून भारतात परतला आणि दिल्लीतून आपल्या कारमधून घराकडे म्हणजे रूरकी येथे जात होता. यावेळेस ३० डिसेंबरला ऋषभच्या कारला अपघात झाला. ही घटना रूरकी जवळ असणाऱ्या नारसन भागात घडली. या वेळी ऋषभ पंत गाडीत एकटाच होता आणि स्वत: गाडी चालवत होता. पंतने सांगितले की, तो गाडीची काच फोडून बाहेर आला होता. यानंतर कारला आग लागली. (Sourav Ganguly on Rishabh Pant)
अपघात झाल्यानंतर पंतला रूरकी येथील सक्षम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याला डेहराडून येथील मॅक्स रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मॅक्स रूग्णालयात पंतवर सर्जरी करण्यात आली आहे. यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला. पंत एयरलिफ्ट करून मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले.