

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rishabh Pant in Lilavati Hospital : भीषण अपघातात जखमी झालेला भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant Health Update) याला पुढील उपचारासाठी आज (दि. 4) मुंबईच्या लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले. 30 डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर पंत डेहराडूनमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. अखेर त्याला बुधवारी एयरलिफ्ट करुन मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले.
कार अपघातात जखमी झालेल्या पंतच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. पण अजूनही त्याच्या शरीराच्या काही भागात वेदना आणि सूज आहे. ज्यासाठी त्याला 'पेन मॅनेजमेंट थेरेपी' दिली जात आहे. दरम्यान बुधवारी दुपारी त्याला मुंबईतील प्रसिद्ध लिलावती रुग्णालयात एअरलिफ्ट करून आणण्यात आले. पंतच्या लिगामेंट दुखापतीवरील पुढील उपचार या ठिकाणी होतील अशी माहिती समोर आली आहे. बीसीसीआयने यासाठी संमती दिली असून मंडळाचे वैद्यकीय पथक रुग्णालयात उपस्थित असेल असेही समजते आहे.