INDvsNZ ODI : न्यूझीलंडचा भारतावर 7 विकेट्स राखून विजय! | पुढारी

INDvsNZ ODI : न्यूझीलंडचा भारतावर 7 विकेट्स राखून विजय!

पुढारी ऑनलाइन डेस्क : न्यूझीलंडने भारतावर सात गडी राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात किवी संघाने 47.1 षटकात तीन गडी गमावून 309 धावा केल्या. न्यूझीलंडकडून केन विल्यमसन (98 चेंडूत नाबाद 94 धावा) आणि टॉम लॅथम (104 चेंडूत नाबाद 145 धावा) यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी 221 धावांची विक्रमी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, शिखर धवन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 50 षटकांत 7 बाद 306 धावा करून न्यूझीलंडसमोर 307 धावांचे आव्हान ठेवले. शिखर धवनने 77 चेंडूत 72, शुभमन गिलने 65 चेंडूत 50 आणि श्रेयस अय्यरने 76 चेंडूत 80 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साउदी आणि लॉकी फर्ग्यूसनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर अॅडम मिल्नेने एक विकेट घेतली.

307 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिन अॅलेन आणि कॉन्वे यांनी डावाची सुरुवात सावध केली. पण सातव्या षटकांत भारताने न्यूझीलंडला पाहिला धक्का दिला. शार्दुल ठाकरने फिन अॅलनची विकेट घेतली. पंतने त्याचा झेल टिपला. सोळाव्या षटकांत उमरान मलिकने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. उमरानच्या चेंडूवर कॉन्वे झेलबाद झाला. 20 व्या षटकांत उमरान मलिकने आणखी एक विकेट घेत डॅरिल मिशेलला माघारी पाठवले. मिशेलचा झेल हुडाने घेतला. त्यानंतर केन विल्यमसन आणि टॉम लॅथम जोडीने संघाचा डाव सावरला आणि 221 धावांची भागिदारी करून संघाला विजय मिळवून दिला. लॅथमने वनडे कारकिर्दीतील सातवे शतक अवघ्या 76 चेंडूत झळकावले. त्याने 19 चौकार 5 षटकार ठोकत नाबाद 145 आणि विल्यमसनने 7 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने 94 धावांची विजयी खेळी साकारली. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक दोन बळी घेतले. मात्र, या सामन्यात भारताचे सर्व गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. सुंदरने टीच्चून गोलंदाजी केली आणि धावा रोखण्यात तो यशस्वी झाला. पण पण त्याला एकही विकेट घेता आली नाही.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली. शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर २४ व्या षटकांत अर्धशतकी खेळी करून शुभमन गिल बाद झाला. शुभमनने 65 चेंडूत 50 धावा केल्या. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर डेव्हॉन कॉन्वेने त्याचा झेल घेतला. अर्धशतक झळकावल्यानंतर झटपट धाव घेण्याच्या प्रयत्नात गिल सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावत अर्धशतकी खेळी केली. त्यापाठोपाठ शिखर धवनही बाद झाला. शिखर धवन 72 धावा करून बाद झाला. टीम साऊदीने धवनला चकवत झेलबाद केले. धवनने 77 धावांच्या खेळीत 13 चौकार लगावले.

भारताला 32 व्या षटकांत फर्ग्युसनने पाठोपाठ दोन धक्के दिले. पंत पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. 32 व्या षटकांच्या दुसऱ्या चेंडूवर फर्ग्युसनने पंतची विकेट घेतली. पंत 23 चेंडूत 15 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर याच षटकातील पाचव्या चेंडूवर फर्ग्युसनने सुर्यकुमार यादवची विकेट घेतली. फिन ऍलननं त्याचा झेल टिपला. सुर्यकुमारला अवघ्या 4 धावा करुन माघारी परतावे लागले.

ऋषभ पंत आणि सूर्यकुमार बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला. त्याने वनडे कारकिर्दीतील 13 वे अर्धशतक झळकावले. 45 व्या षटकांत मिल्नेच्या चेंडूवर संजू सॅमसन आउट झाला. ग्लेन फिलिप्सने त्याचा झेल टिपला. सॅमसनने 38 चेंडूत 36 धावांची खेळी केली. अय्यर आणि सॅमसनने 77 चेंडू खेळत 94 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. अखेरच्या षटकात टीम साउदीने श्रेयसची विकेट मिळवली. कॉन्वेने त्याचा झेल घेतला. 76 चेंडूत त्याने 80 धावा केल्या. त्यानंतर साउदीने शार्दुल ठाकूरला माघारी पाठवले. शार्दुल ठाकूरने केवळ 1 धाव घेतली.

टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेला सुरुवात झाली. भारतात 2023 मध्ये होणार्‍या वन-डे वर्ल्डकपच्या तयारीलाही याच मालिकेतून सुरुवात होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आदी अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. भारताकडून उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना पदार्पणाची संधी मिळाली. दीपक चहरला शेवटच्या अकरामध्ये स्थान मिळालेले नाही.

या सामन्यात शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानावर उतरली. तर न्यूझीलंडचा संघ केन विलियम्सनच्या नेतृत्वात खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाची नजर आता एकदिवसीय मालिकेत किवीजचा पराभव करण्यावर आहे. जर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली तर तो आयसीसी क्रमवारीत नंबर 1 वन-डे संघ बनेल.

IND vs NZ 1st ODI : भारत : शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सैमसन, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.

न्यूझीलंड : फिन एलेन, डेवोन कॉन्वे, केन विलियम्सन (कॅप्टन), टॉम लाथम (विकेटकीपर), डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सैंटनर, एडम मिल्ने, मैट हेनरी, टिम साउदी, लॉकी फर्ग्यूसन.

हे ही वाचा :

Back to top button