INDvsNZ T20 : भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय! | पुढारी

INDvsNZ T20 : भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता, मात्र दुसरा सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. आता भारत शेवटचा सामना जिंकून मालिका 2-0 ने जिंकू शकतो. त्याचबरोबर किवी संघाला शेवटचा सामना जिंकून मालिका 1-1 अशी खिशात घालण्याची संधी आहे.

तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात काही खास नव्हती. भारताची पहिली विकेट 36 धावांवर पडली, जेव्हा ऋषभ पंत 13 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. यानंतर ईशान किशनने वेगवान धावा करत भारताची धावसंख्या 50 च्या पुढे नेली, पण तोही 31 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. या सामन्यात पावसामुळे 27 मिनिटांचा खेळ वाया गेला, मात्र षटकांच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही.

एका टोकाला, सूर्यकुमार यादवने जबाबदारी स्वीकारली आणि वेगवान धावा केल्या, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. श्रेयस अय्यर 9 चेंडूत 13 धावा केल्यावर विकेट पडली. त्यानंतर कर्णधार हार्दिक 13 चेंडूत 13 धावा करून माघारी परतला. दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खातेही उघडता आले नाही. अखेरीस, सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 111 धावा फटकावल्या आणि किवींसमोर विजयासाठी मोठे लक्ष्य ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली. आपल्या खेळीत 11 चौकार आणि सात षटकार मारले. त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने सहा गडी गमावून 191 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि लोकी फर्ग्युसनने दोन विकेट घेतल्या. ईश सोधीला एक विकेट मिळाली.

केन विल्यमसनचे अर्धशतक

केन विल्यमसनने कारकिर्दीतील 17 वे अर्धशतक झळकावले आहे. त्याने 18व्या षटकात मोहम्मद सिराजच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने भारताविरुद्ध तिसरे अर्धशतक ठोकले आहे.

न्यूझीलंडची सहावी विकेट

16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला. मोहम्मद सिराजने मिचेल सँटनरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सिराजनेच सॅन्टनरचा झेल घेतला. सँटनरने सात चेंडूंत दोन धावा केल्या. न्यूझीलंडने 16 षटकांत 6 बाद 99 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडची पाचवी विकेट

न्यूझीलंडचा निम्मा संघ 89 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. युझवेंद्र चहलने जेम्स नीशमला बाद करून भारताला पाचवे यश मिळवून दिले. या सामन्यातील त्याचे हे दुसरे यश आहे. न्यूझीलंडची धावसंख्या 14 षटकांत 5 बाद 91 अशी होती.

न्यूझीलंडची चौथी विकेट पडली

88 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची चौथी विकेट पडली. दीपक हुडाने डॅरिल मिशेलला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. मिशेलने 11 चेंडूत 10 धावा केल्या. 13 षटकांनंतर किवी संघाची धावसंख्या 4 बाद 88 अशी होती

न्यूझीलंडची तिसरी विकेट

69 धावांवर न्यूझीलंडची तिसरी विकेट पडली. युझवेंद्र चहलने ग्लेन फिलिप्सला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. फिलिप्सने सहा चेंडूंत 12 धावा केल्या. चहलने त्याला क्लीन बोल्ड केले. 10 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या तीन गड्यांच्या 71 होती.

न्यूझीलंडची दुसरी विकेट

56 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची दुसरी विकेट पडली. वॉशिंग्टन सुंदरने डेव्हन कॉनवेला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले आहे. कॉनवेने 22 चेंडूत 25 धावा केल्या. नऊ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या दोन बाद 63 अशी होती.

न्यूझीलंडची धावसंख्या 50 च्या पुढे

न्यूझीलंडने एक विकेट गमावून अर्धशतक धावफलकावर झळकावले. केन विल्यमसन आणि डेव्हन कॉनवे यांनी अर्धशतकी भागीदारी केली. दोन्ही फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध झटपट धावा काढत होते. आठ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या एका विकेटवर 56 अशी होती.

पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडच्या 32 धावा

किवी संघाने पहिल्या सहा षटकात एक गडी गमावून 32 धावा केल्या. केन विल्यमसन आणि डेव्हन कॉनवे क्रीजवर होते. दोघेही संयमी फलंदाजी करत होते.

न्यूझीलंडची पहिली विकेट

192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. विस्फोटक फिन ऍलन खाते न उघडताच बाद झाला. सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने त्याला अर्शदीप सिंगकडे झेलबाद केले. एका षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या एका विकेटवर एक धाव होती.

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला जात आहे. या सामन्यात किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. आजच्या सामन्यात ऋषभ पंत आणि ईशान किशन ही भारताची नवी सलामी जोडी उतरली. टी 20 क्रिकेटमध्ये दोन डावखुरे फलंदाज सलामीला उरण्याची ही भारतासाठीची चौथी वेळ ठरली.

सूर्यकुमारचे अर्धशतक

सूर्यकुमार यादवने 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या उत्कृष्ट खेळीमुळे भारताची धावसंख्या 125 धावांच्या पुढे गेली. हे त्याचे टी 20 क्रिकेटमधील हे 13 वे अर्धशतक ठरले. या खेळीसह सूर्यकुमारने पहिल्या क्रमांकाचा टी 20 फलंदाज म्हणून आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. भारताची धावसंख्या 16 षटकांनंतर 3 बाद 129 होती.

भारताची तिसरी विकेट

भारताची तिसरी विकेट 108 धावांवर पडली. या सामन्यात श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत होता, पण तो हिट विकेटवर आऊट झाला. त्याने नऊ चेंडूत 13 धावा केल्या. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. भारताची धावसंख्या 14 षटकांनंतर 3 बाद 116 अशी होती.

भारताची धावसंख्या 100 पार

भारताच्या धावसंख्येने दोन विकेट गमावून 100 धावा ओलांडल्या. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी वेगवान धावा केल्या.

ईशान किशन 36 धावा करून बाद

इशान किशन 31 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचा झेल टिम साऊदीने ईश सोधीच्या चेंडूवर टिपला. सोधी हा भारताविरुद्धच्या टी 20मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत 21 विकेट घेतल्या आहेत. त्याने 21 बळी घेणाऱ्या इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनची बरोबरी केली आहे.

भारताच्या आठ षटकांत 59 धावा

आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 59 धावा होती. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन क्रीजवर होते.

रिव्ह्यूने ईशानला वाचवले

पावसानंतर केन विल्यमसनने ईश सोधीला गोलंदाजीसाठी बोलावले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर इशान किशनला पायचीत केले. एलबीडब्ल्यूच्या अपीलवर अंपायरने त्याला बाद घोषित केले. मात्र, रिव्ह्यू घेतल्यावर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात असल्याचे दिसून आले आणि किशन क्रीजवरच राहिला.

सामना सुरू

बे ओव्हल येथे पाऊस थांबल्यानंतर सामना सुरू झाला. सात षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 51 अशी होती. या सामन्यात पावसामुळे 27 मिनिटांचा खेळ वाया गेला. मात्र षटकांच्या संख्येत कोणतीही घट करण्यात आली नाही.

पावसामुळे खेळ थांबला

भारताची धावसंख्या 6.4 षटकांनंतर एक विकेट गमावून 50 असताना पावसामुळे खेळ थांबला. यावेळी ईशान किशन 22 चेंडूत 28 तर सूर्यकुमार पाच चेंडूत सहा धावांवर मैदानात होते.

पॉवरप्लेमध्ये भारताची धावसंख्या एक बाद 42

पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाने एक विकेट गमावून 42 धावा केल्या. पंत बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. त्याने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळला, पण चेंडू बॅटऐवजी त्याच्या ग्लोव्हजला लागला. मात्र, तो नशीबवान ठरला आणि त्याला चार धावा मिळाल्या.

पाच ओव्हर्सनंतर भारताची धावसंख्या 36

भारतीय संघाने पाच षटकांचा खेळ पूर्ण केल्यानंतर एकही विकेट न गमावता 36 धावा केल्या होत्या. टी 20 विश्वचषक 2022 मध्ये भारतासाठी सर्वोच्च सलामीची भागीदारी 27 धावांची होती. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात पंत आणि किशन या डावखु-या जोडीने 36 धावा केल्या. मात्र, याच धावसंख्येवर भारताला पहिला झटका बसला. पंतच्या रुपात पहिली विकेट 36 धावांवर पडली. त्याने 13 चेंडूत सहा धावा केल्या. या सामन्यात तो चांगल्या लयीत दिसत नव्हता. या छोट्या खेळीदरम्यान तो सतत टायमिंगसाठी झगडत होता.

ईशान किशनला जीवदान

या सामन्यात ईशान किशनला जीवदान मिळाले. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ईशानने ऑफ साइडने शॉट खेळून धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण नॉनस्ट्रायकर वर असणा-या पंतने नकार दिला. मात्र तोपर्यंत धाव घेण्याच्या नादात इशान खूप पुढे गेला होता, अशातच न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षक यष्टींवर चेंडू मारण्यात अपयशी ठरला. यासह इशानला जीवदान मिळाले. यावेळी तो 13 धावांवर खेळत होता.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :

इशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन

Back to top button