मँचेस्टर युनायटेडने धोका दिला : ख्रिस्तीयानो रोनाल्डो | पुढारी

मँचेस्टर युनायटेडने धोका दिला : ख्रिस्तीयानो रोनाल्डो

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मँचेस्टर युनायटेडने धोका दिल्याचा आरोप पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डोने केला आहे. नुकतीच रोनाल्डोने एक मुलाखत दिली. यात त्याने हा आरोप केला आहे. कतार येथे फिफा वर्ल्डकप 2022 अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू होत आहे. अनेक देश आपला संघ जाहीर करत आहेत. मात्र क्लब फुटबॉलमधील वाद काही पाठ सोडत नाहीत. ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने क्लबचे व्यवस्थापक एरिक टेन हॅग आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी मला जबरदस्तीने क्लबमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असा दावा केला आहे.

जेव्हापासून हॅन यांनी मँचेस्टर युनायटेडची सूत्रे हातात घेतली आहे तेव्हापासून रोनाल्डो हा चर्चेचा विषय ठरला आहे. महिन्याभरापूर्वी रोनाल्डोला शिस्तभंगाबाबतची ताकीद देण्यात आली होती. त्याने टोटेनहॅमविरुद्धच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात जाण्यास नकार दिला होता. गेल्या आठवड्यात रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडचे नेतृत्व केले, मात्र संघ 3 – 1 असा पराभूत झाला.

रविवारी झालेल्या सामन्यात युनायटेडने फुलहॅमवर 2 – 1 असा विजय मिळवला. मात्र यावेळी रोनाल्डो गैरहजर होता. आता वर्ल्डकपसाठी सहा आठवड्यांचा ब—ेक घेतला आहे. दरम्यान, रोनाल्डोने एका टीव्ही शोमध्ये सांगितले की, ‘माझ्या मनात टॅन हँगविषयी आदर नाही कारण तो मला आदर देत नाही. फक्त प्रशिक्षक नाही तर क्लबमधील इतर दोघे-तिघेदेखील असेच वागतात. माझ्या मनात धोका दिल्याची भावना निर्माण झाली आहे.’

रोनाल्डो पुढे म्हणाला की, ‘मात्र क्लबमध्ये अंतर्गत काही बाबी आहेत ज्यामुळे क्लब मँचेस्टर सिटीसारखा टॉप लेव्हलवर पोहोचू शकत नाही. लीव्हरपूल आणि आता अर्सेनाल देखील बघा. मँचेस्टर युनायटेड पहिल्या तीन क्लबमध्ये सामील असला पाहिजे, मात्र दुर्दैवाने ते होत नाही.’

अ‍ॅलेक्स फर्ग्युसन यांच्यानंतर परिस्थिती बदलली

अ‍ॅलेक्स फर्ग्युसन मॅनेजर असताना युनायटेडकडून रोनाल्डो जबरदस्त कामगिरी करत होता. त्यावेळी क्लबने तीन प्रीमियर लीग टायटल जिंकले होते. याचबरोबर चॅम्पियन्स लीग आणि रोनाल्डोने पहिला बॅलन डी ऑर पुरस्कार देखील जिंकला होता. रोनाल्डोने गेल्या हंगामात 24 गोल करूनदेखील मँचेस्टर युनायटेडला चॅम्पियन्स लीगची पात्रता फेरी पार करता आली नव्हती. रोनाल्डो म्हणाला की, ‘जेव्हापासून अ‍ॅलेक्स यांनी क्लब सोडला. त्यामुळे मला क्लबमध्ये कोणताही विकास झालेला दिसत नाहीये. काही बदलले नाही. क्लबचे चांगले व्हावे असे मला वाटते म्हणूनच मी मँचेस्टर युनायटेडमध्ये आलो होतो.’

Back to top button