T20 World Cup : मेलबर्नला कोण जिंकणार? पाकिस्तान, इंग्लंड की पाऊस | पुढारी

T20 World Cup : मेलबर्नला कोण जिंकणार? पाकिस्तान, इंग्लंड की पाऊस

मेलबर्नला नेहमीच ड्रॉप इन खेळपट्टी म्हणजे बाहेरून तयार करून आणून इथे बसवलेली वापरतात. या सामन्याला खेळपट्टी नवीन असेल, पण इथल्या वातावरणात तिच्यात दमटपणा नक्कीच आला असून ती जलदगती गोलंदाजांना वेग नि बाऊन्ससाठी साथ देईल. खेळपट्टीवर गवत राखले आहे, पण रविवारच्या हवामानावर सर्व अवलंबून असेल. खेळपट्टीचे कव्हर रविवारी सामन्याच्या (T20 World Cup) आधी कधी काढले जाईल यावर खेळपट्टीचा परिणाम अवलंबून असेल.

विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीच्या पहिल्या आठवड्यात जे संघ स्पर्धेबाहेर पडायच्या बेतात होते ते आज या विश्वचषकाचा अंतिम सामना (T20 World Cup) खेळायला आज मेलबर्नमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या आणि त्याहून झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवर अक्रम, वकार आदींनी बाबर आझमच्या संघाला लाखोली वाहिली होती. बाबरच्या संघाने नैसर्गिक खेळ करत सुसूत्रपणे वाटचाल करत असलेल्या न्यूझीलंडला घरी पाठवले तर इंग्लंडने भारताची वाताहत केली. त्या बाबर-रिझवान किंवा बटलर-हेल्स खेळ बघताना राहून राहून एकच विचार येत होता तो म्हणजे रोहित शर्मा आणि राहुल गुणवत्ता असताना असे मोकळेपणाने का खेळू शकले नाहीत?

असो, पराभवाची आपली जखम अजून भळभळत असली तरी आज या अंतिम सामन्याला एका तटस्थतेने आपल्याला बघायचे आहे. अ‍ॅडलेडहून मी शुक्रवारी रात्री मेलबर्नला उतरलो तर विमानतळाच्या बाहेर पडताच पावसाच्या धारांनी स्वागत केले. तशी पावसाची भविष्यवाणी शनिवार, रविवार आणि सोमवारची होती, पण काल शनिवार तरी ढगाळ वातावरणात कोरडा गेला. मेलबर्नच्या सिटी सेंटरमध्ये खूप मोठ्या संख्येने पाकिस्तानी प्रेक्षक शनिवारपासूनच दिसत होते. पाकिस्तानी संघ ज्या हॉटेलात उतरला आहे त्याच्या बाहेर उभ्या असलेल्या एका घोळक्याची हवामानाच्या अंदाजावर जोरदार चर्चा चालू होती.

भारताबरोबरचा सामनाही वाहून जाणार, असा अंदाज असताना तो झाला तर हा अंतिम सामनाही व्हावा अशीच दुआ ते मागत होते. शनिवार संध्याकाळपर्यंत त्यांची ही दुआ ऐकली गेली, पण शनिवारी रात्री इथे पाऊस सुरू झाला आहे. या सामन्यासाठी मेलबर्न पूर्ण सज्ज झाले आहे. 1992 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंड-पाकिस्तान लढले होते. त्यानंतर पुन्हा 30 वर्षांनी त्याच ठिकाणी हे दोन संघ भिडणार आहेत. तेव्हा इम—ान खानने इंग्लंडविरुद्ध लढताना पाकिस्तानला पाठिंबा द्यायला इथल्या भारतीयांना आवाहन केले होते.

गेल्या 30 वर्षांत झेलम, चिनाब आणि रावी नदीच्या पुलाखालून खूप पाणी वाहून गेल्याने बाबर हे असले काही आवाहन करू शकत नाही. माझ्या मेलबर्नच्या पंजाबी टॅक्सीवाल्याने मात्र सांगितले त्यांच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर पाकिस्तानी प्रेक्षक भारतीयांना शेजारी म्हणून तिकिटे द्यायचे आवाहन करत आहेत.

मेलबर्नमध्ये भारताला 160 धावांचा आणि इंग्लंडला आयर्लंडच्या 157 धावांचा पाठलाग करायलाही घाम फुटला होता. या विश्वचषकातील मेलबर्नच्या 6 पैकी 3 लढती पावसात वाहून गेल्या. भारताने लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे केला तर इतर दोन सामन्यांत पहिली फलंदाजी करणार्‍या संघाने सामना जिंकला.

इथल्या पावसावर सर्व अवलंबून असल्याने आणि डकवर्थ लुईसचा वापर होण्याची दाट शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी घेईल. डकवर्थ लुईसच्या निर्णयासाठी किती षटकांत किती धावा काढाव्या लागतील याचा अंदाज घेणे शक्य होते. त्याचप्रमाणे पावसानंतर जेव्हा सामना चालू होतो तेव्हा आऊटफिल्डमुळे ओला झालेला चेंडूना स्विंग होत ना वळत तेव्हा फलंदाजी करणार्‍या संघाचा फायदा असतो. आपल्याविरुद्ध बांगलादेश याच तर्काने आरामात जिंकायला हवे होते, पण त्यांनी हाराकिरी केली. पाकिस्तानचा जलदगती मारा जास्त तिखट असल्याने पाकिस्तान तसेही पहिली गोलंदाजी करायला उत्सुक असतील.

मेलबर्नच्या लांबच्या सीमारेषा गाठायला फलंदाजांना विशेष मेहनत घ्यावी लागत असल्याने या मैदानावर धावून काढणार्‍या धावांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्लंड या बाबतीत पाकिस्तानशी वरचढ ठरते. या मैदानावर जलदगती गोलंदाजांनी आपला वेग कमी करून आणि आखूड टप्प्याची गोलंदाजी करणे अपेक्षित आहे जेणेकरून फलंदाजांना चेंडूच्या वेगाचा फायदा घेता येणार नाही. सिडनीला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी हेच तंत्र वापरले होते. हॅरिस रौफचे तर हे बिग बॅशमधले घरचे मैदान आहे तेव्हा त्याच्याकडून इंग्लंडला धोका आहे. जेव्हा पाकिस्तान खेळत असते तेव्हा दोन्ही संघांची तुलना करणे हे खरोखरच कठीण असते. नुसती आकडेवारी किंवा क्रिकेटचे संकेत वापरले तर इंग्लंडचा संघ जास्त संतुलित वाटतो. मार्क वूड आणि मलान कदाचित हा सामना खेळू शकतील. तसे झाले तर इंग्लंडची बाजू बळकट वाटते.

इंग्लंडच्या सर्व आशा बटलर आणि हेल्सच्या उत्तम सुरुवातीवरच आहेत. जरी त्यांच्याकडे अगदी 11व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असली तरी कर्णधार लवकर तंबूत परतला तर इतर शिलेदारांवर त्याचा परिणाम होईल. पाकिस्तानचे एकमेव डावपेच असतील ते म्हणजे बटलरला लवकर बाद करणे. अलेक्स हेल्सही बिग बॅश खेळात असल्याने त्याला या मैदानाचा सराव आहे. बटलरला रोखायला चेंडूचा वेग कमी करणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हा पाकिस्तानने पॉवर प्लेमध्ये जर आतापर्यंत फिरकी गोलंदाज वापरले नसले तरी या सामन्यात ते शादाब आणि नवाझला पॉवर प्लेमध्ये आणतील, असा अंदाज आहे. जर मलान फिट झाला नाही तर इंग्लंड मोईन अलीला फटकेबाजी करायला फलंदाज म्हणून बढती देईल.

दुसर्‍या बाजूला आदिल राशिदने फॉर्मातल्या सूर्यकुमार यादवला जखडवले आणि बाद केले तसेच त्याच्या गुगलीचा वापर बाबरविरुद्ध बटलर करेल. हा सामना असणार आहे तो दोन तुल्यबळ संघांत ज्यांच्यात तोडीस तोड जलदगती गोलंदाज आहेत, फिरकीपटू आहेत, सलामीवीर आहेत आणि मुख्य म्हणजे सगळेच भारतीय क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर फिनिशर आहेत किंवा मॅच विनर आहेत.

दोन्ही संघांचे मनसुबे समोरच्या सलामीच्या जोडीला लवकरात लवकर कसे खिंडार पाडता येईल हेच असतील. ज्या संघाची सलामी लवकर कोसळेल त्यावर पुढचे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ करतील का इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनाक करतील हे अवलंबून आहे.

मार्क वूड इंग्लंड संघात परतणार (T20 World Cup)

इंग्लंडच्या संघात आता मार्क वूड हा मॅचविनर गोलंदाज संघात परतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघासाठी ही एक धोक्याची घंटा समजली जात आहे. वूडने आतापर्यंत या विश्वचषकात तब्बल 9 विकेटस् पटकावलेल्या आहेत.

इंग्लंडचा संघ मंगळवारी सराव करत असताना वेगवान गोलंदाज मार्क वूड हा जायबंदी झाला असल्याचे समोर आले होते. ही दुखापत एवढी गंभीर स्वरूपाची होती की, त्याने सराव करणे तत्काळ सोडून दिले आणि डॉक्टरांकडे धाव घेतली होती. त्यामुळेच त्याला भारताविरुद्ध खेळवण्यात आले नव्हते, पण आता वूड फिट झाला आहे आणि पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी त्याने नेटसमध्ये सराव केला आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये वूडला संधी देण्यात येऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. जर वूडला संघात स्थान द्यायचे असेल तर कोणता खेळाडू संघाबाहेर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण शक्यतो सामना जिंकलेला संघ बदलला जात नाही, पण फायनलमध्ये आता इंग्लंड काय करणार, याची उत्सुकता असेल.

निमिष पाटगावकर

Back to top button