India vs England : संस्मरणीय विजय; पण संघबांधणीत लवचिकता हवी | पुढारी

India vs England : संस्मरणीय विजय; पण संघबांधणीत लवचिकता हवी

निमिष पाटगावकर

भारताच्या ओव्हलवरच्या1971 च्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असतानाच विराट कोहलीच्या संघाने ओव्हलवर इंग्लंडचा पराभव करून मालिकेत (India vs England) आघाडी घेतली.

शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीला सामन्याच्या निकालाच्या तिन्ही शक्यता असताना दुसर्‍या सत्रात निर्जीव खेळपट्टीवर आपल्या गोलंदाजांनी विजयश्री खेचून आणली. बुमराहचे रिव्हर्स स्विंग, जडेजाची टिच्चून गोलंदाजी आणि शार्दुल ठाकूर आणि उमेश यादवने योग्य वेळी बळी मिळवत भारताचा विजय निश्चित केला.

त्याला जोड होती ती कोहलीच्या कल्पक डावपेचांची आणि आक्रमक क्षेत्ररक्षणाची. गेल्या काही महिन्यांत भारतीय संघात जी विजिगीषू वृत्ती निपजलेली दिसते. त्यामुळे कुठच्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडत सामना जिंकायचे कसब आपण अवगत केले आहे.

भारतीय संघात जरी हा बदल सुखावह असला तरी डावपेचांचा भाग म्हणून निव्वळ आत्मविश्वास दरवेळी यश देईलच असे नाही. तेव्हा धोरणात्मक निर्णय हे कायमच महत्त्वाचे असतात. (India vs England)

इंग्लंडमध्ये उन्हाळ्यातही कडकडीत उन्हाळ्याची खात्री कधीच देता येत नाही. तेव्हा स्विंगला पोषक ढगाळ वातावरण हे कधीही सोबतीला असतेच. त्याचप्रमाणे इंग्लंडमधील बहुतांशी मैदाने आता पाण्याचा उत्तम निचरा करणारी असल्याने खेळपट्टी टिकून राहण्यासाठी सामन्याच्या सुरुवातीपर्यंत गवत ठेवणे गरजेचे झाले आहे.

ढगाळ हवा, सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टीतील दमटपणा याचा फायदा नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेत असतो. अशावेळी नाणेफेकीसारखा जो घटक आपल्या हातात नसतो यासाठी आपले संघनिवडीचे नियोजन महत्त्वाचे ठरते.

लीडस्ला नाणेफेक जिंकूनही चुकीच्या निर्णयाने पहिल्या डावात सर्वबाद 78, दुसर्‍या डावात उत्तम सुरुवातीनंतर 63 धावांत 8 बळी गमावणे आणि ओव्हलला नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करायला लागल्याने पहिल्या डावात 7 बाद 127 अवस्था हेच स्पष्ट करतात की आपली मधली फळी अजून तकलादू आहे.

संघाच्या रचनेत बदल करणे गरजेचे

या सामन्यासाठी संघनिवड करताना कोहली संघाच्या रचनेत बदल करून एक फलंदाज जास्त घेईल किंवा चार डावखुरे फलंदाज असणार्‍या संघाविरुद्ध खेळायला इथल्या खेळपट्टीची फिरकीला मिळणारी साथ आणि बाउन्सचा उत्तम वापर करायला अश्विनला संघात घेईल असे वाटले होते; पण कोहली त्याच्या पाच गोलंदाजांच्या संकल्पनेपासून दूर जायला तयार नाही.

सुदैवाने लॉर्डस्ला शमी-बुमराह किंवा ओव्हलला शार्दुल-उमेशच्या फलंदाजीने भारताला संकटातून बाहेर काढले; पण आपण याची नेहमीच अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. जसे लीडस्ला ते घडले नाही. तेव्हा कुठच्याही खेळपट्टीवर कुठच्याही वातावरणात बळी मिळवून देणारे उत्तम गोलंदाज निवडले तर समोरचे वीस बळी घ्यायला चार गोलंदाज पुरेसे पडू शकतात. याचप्रमाणे रहाणेच्या फलंदाजीच्या क्रमात केलेला बदल अनाकलनीय होता.

धावा होत नसल्याने आधीच कमी आत्मविश्वास असलेल्या रहाणेने एक उत्तम संघवृत्ती असलेला खेळाडू म्हणून हे मान्य केले असले तरी यामुळे त्याचा आत्मविश्वास नक्कीच डळमळीत झाला असेल. डावी-उजवी फलंदाजीची जोडी करण्याचा हा दूरगामी विचार असेल तर ऋषभ पंतने पाचवा क्रमांक घ्यायला हवा.

Back to top button