रोहित शर्मा कर्णधारपदाच्या जबाबदारीखाली दबलाय : शोएब अख्तर | पुढारी

रोहित शर्मा कर्णधारपदाच्या जबाबदारीखाली दबलाय : शोएब अख्तर

कराची ; वृत्तसंस्था : आशिया चषक 2022 स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तानचे माजी खेळाडू काहीही बरळत आहेत. मोहम्मद हाफिजनंतर आता माजी गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. रोहित शर्मा कर्णधारपदाच्या ओझ्याखाली अडकला आहे, असे त्याने म्हटले आहेे.

रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 18 चेंडूंत 12 धावा करता आल्या, तर हाँगकाँगविरुद्ध त्याला 13 चेंडूंत 21 धावा करता आल्या. या दोन्ही सामन्यांत रोहितला मोठी खेळी करता आली नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे माजी खेळाडू संधी साधून टीका करत आहेत. अख्तरने म्हटले की, रोहित शर्मा कर्णधारपदाच्या ओझ्याखाली अडकला आहे.

तो या जबाबदारीचा आनंद घेताना दिसत नाही आणि त्याचे प्रचंड दडपण घेतले आहे. त्यामुळेच त्याची कामगिरी खराब होतेय. ट्वेंटी-20 मध्ये हार्दिक पंड्या हा कर्णधारपदाचा सक्षम दावेदार आहे. त्याने दुखापतीतून सावरल्यानंतर दमदार पुनरागमन केले आहे आणि गुजरात टायटन्सला त्याने आयपीएल 2022 चे जेतेपदही जिंकून दिले आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार हाफिजने यापूर्वी रोहितवर टीका केली होती. 35 वर्षीय रोहितची देहबोली कमकुवत वाटते आहे. तो घाबरलेला व गोंधळलेला दिसतो आहे. त्याच्यावर कर्णधारपदाचे दडपण जाणवते आहे आणि त्याला काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असा दावा केला. हाफिजने पुढे जाऊन असे म्हटले की, रोहित फार काळ कर्णधारपदावर कायम राहणार नाही.

Back to top button