टीम इंडियामध्ये मोठा बदल! Asia Cup 2022 साठी व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआयची घोषणा | पुढारी

टीम इंडियामध्ये मोठा बदल! Asia Cup 2022 साठी व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआयची घोषणा

पुढारी डेस्क : व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांची आशिया चषक २०२२ साठी (Asia Cup 2022) टीम इंडियाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक (interim Head Coach) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाचे नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाला आहे. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.

झिंबाब्वेमध्ये एकदिवसीय मालिका खेळलेल्या भारतीय संघासोबत राहिलेले लक्ष्मण हे राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या तयारीकडे लक्ष देतील. संघ यूएईला रवाना होण्यापूर्वी द्रविड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. द्रविड यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला मंजुरी दिल्यावर ते पुन्हा संघात सामील होतील, असे बीसीसीआयने (BCCI) म्हटले आहे.

लक्ष्मण हे बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. त्यांचे अनेक भारतीय खेळाडूंशी चांगले संबंध आहेत. जुलैमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यात आणि ऑगस्टमधील झिंबाब्वेच्या दौऱ्यात ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. या दोन्ही दौऱ्यासाठी भारताने दुसऱ्या क्रमांकाचा संघ पाठवला होता. लक्ष्मण आता पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने संघासाठी काम करणार आहेत.

आशिया चषक २०२२ स्पर्धा (Asia Cup 2022) येत्या शनिवारी (२७ ऑगस्ट) पासून युएई येथे सुरू होईल. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघ यूएई (UAE) येथे पोहोचले आहेत. टीम इंडिया आपला पहिला सामना २८ ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. आशिया चषक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा स्थितीत सर्व संघ जोरदार सराव करत आहेत.

Back to top button