सूर्यकुमारचा खेळ एबीडीसारखा : रिकी पाँटिंग | पुढारी

सूर्यकुमारचा खेळ एबीडीसारखा : रिकी पाँटिंग

सिडनी ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रिकी पाँटिंगने भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवची तुलना ए. बी. डिव्हिलियर्सशी केली आहे. त्याच्याकडेही दक्षिण आफ्रिकेच्या महान खेळाडूप्रमाणे मैदानाच्या चारही बाजूला षटकार मारण्याची क्षमता आहे. टी-20 विश्वचषकात सूर्यकुमारने भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी, असे पाँटिंगने म्हटले आहे.

‘आयसीसी रिव्ह्यू’च्या नवीन एपिसोडमध्ये पाँटिंग म्हणाला, ए. बी. डिव्हिलियर्सप्रमाणेच सूयकुमारमध्ये मैदानाच्या चारही बाजूला षटकार मारण्याची क्षमता आहे. ए. बी. डिव्हिलियर्ससारखाच सूर्यकुमारही 360 डिग्रीचा फलंदाज आहे. तो सर्व प्रकारचे फटके खेळू शकतो; मग तो लेट कट असो किंवा विकेटकिपरच्या डोक्यावरून मारलेला फटका असो. ग्राऊंडेड शॉटस् खेळण्यातही तो पटाईत आहे.

सूर्यकुमारने भारतासाठी आतापर्यंत 23 टी-20 सामन्यांत 672 धावा केल्या आहेत. आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत तो पाकिस्तानच्या बाबर आझमनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला विचारण्यात आले की, सूर्यकुमारने भारतीय इलेव्हनमध्ये कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी, तो म्हणाला, मला वाटते की, तो पहिल्या चारमध्ये असावा. त्याने डावाची सुरुवात करावी, असे मला वाटत नाही.

Back to top button