अल्टिमेट खो-खो : गुजरात जायंटस्ची विजयी सलामी | पुढारी

अल्टिमेट खो-खो : गुजरात जायंटस्ची विजयी सलामी

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पहिल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेच्या (Ultimate Kho-Kho) सलामीच्या लढतीत गुजरात जायंटस् संघाने मुंबई खिलाडीज् संघाचा 69-44 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे रविवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत गुजरातचा कर्णधार रंजन शेट्टीने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. पहिल्या तुकडीत विनायक पारडे, अक्षय भंगारे आणि मारिप्पा यांनी सुरुवात केली. परंतु, मुंबई खिलाडीज् संघाने दोन मिनिटांच्या आतच ही तुकडी तंबूत परतवली. त्यानंतर गुजरात संघाने आक्रमण करताना चांगली सुरुवात केली. परंतु, मुंबईच्या रोहन कोरेने तीन मिनिटे दोन सेकंद संरक्षण करताना गुजरातला रोखून धरले; मात्र गुजरातच्या आक्रमण फळीने जोरदार पुनरागमन करताना पहिल्या डावाअखेर 26-24 अशी निसटती आघाडी मिळवून दिली.

दुसर्‍या डावात मुंबई संघाने आपल्या खेळात लक्षणीय सुधारणा करताना पहिल्या सात मिनिटांनंतर 44-30 अशी आघाडी मिळवली खरी; परंतु अंतिम सत्रात गुजरात जायंटस्ने जबरदस्त कामगिरी बजावताना तब्बल 39 गुणांची कमाई करून 69-44 अशा निर्णायक विजयाची नोंद केली.

अल्टिमेट खो-खो (Ultimate Kho-Kho) लीग या स्पर्धेला अत्यंत दिमाखात आणि अत्यंत उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. लीगचे उद्घाटन अल्टिमेट खो-खो स्पर्धेचे कार्यकारी प्रमुख तेंझिंग नियोगी, अखिल भारतीय खो-खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशू मित्तल आणि महासचिव एम. एस. त्यागी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

Back to top button