पुढील राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश होणार? | पुढारी

पुढील राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश होणार?

लंडन : यावर्षीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी हा खेळ नाही, पण पुढच्या राष्ट्रकुल स्पर्धेत मात्र नेमबाजी हा खेळ आयोजित करण्यात येऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. यंदाच्या राष्ट्रकुलमधून नेमबाजी आणि तिरंदाजी हे क्रीडा प्रकार हटविण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी भारताने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये एकूण 66 पदके पटकावली होती, ज्यातील 25 पदके नेमबाजांकडून लाभली होती. ज्यात सात सुवर्ण पदकांचाही समावेश होता.

कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन आणि 2026 मध्ये ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सची आयोजन समिती गेम्सच्या पुढील हंगामात नेमबाजी स्पर्धांचा समावेश करण्याचा विचार करत आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 2022 च्या हंगामातून नेमबाजी स्पर्धा वगळण्यात आल्या आहेत आणि 2026 मध्ये व्हिक्टोरिया येथील खेळांच्या आयोजन समितीने नुकताच आदेश जारी केल्यानंतर पुढील आवृत्तीच्या क्रीडा वेळापत्रकातून त्या काढून टाकल्या जातील, अशी भीती होती. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती.

कॉमनवेल्थ गेम्सच्या नियमांनुसार अ‍ॅथलेटिक्स आणि जलतरण हे दोनच खेळ अनिवार्य आहेत. पण आता पुढच्या वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश करण्यात येऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. आयोजन समितीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे आणि त्यावर विचार केला जाईल. नेमबाजी महासंघाने आपला प्रस्ताव माडल्यावर त्याचा विचार केला जाईल आणि 2022 च्या अखेरीस वेळापत्रकावरील खेळांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. नेमबाजीबरोबर पुढील स्पर्धेसाठी कुस्तीचा समावेश करण्याची विनंती प्राप्त झाली आहे.

Back to top button