भारत विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन सामना खेळवा | पुढारी

भारत विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन सामना खेळवा

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 22 ऑगस्टला भारत विरुद्ध जागतिक एकादश अशा सामन्याचे आयोजन करण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती पीटीआयला दिली आहे आणि याबाबत त्यांच्याकडून बीसीसीआयशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या सामन्यात भारताच्या स्टार खेळाडूंसह परदेशातील काही दिग्गजांच्या समावेशाची मंत्रालयाला अपेक्षा आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या मोहिमेंतर्गत ही मॅच होणार आहे.

या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. पण, भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक व अन्य बाबींचा विचार करण्यात येईल, असेही स्पष्ट केले गेले. “भारतीय संघ विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन असा सामना 22 ऑगस्टला आयोजित करावा, असा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. वर्ल्ड इलेव्हन संघासाठी किमान 13-14 आंतरराष्ट्रीय खेळाडू हवेत. त्यांच्या उपलब्धतेबाबत आम्ही चाचपणी सुरू केली आहे,” असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

या कालावधीत इंग्लंडमध्ये स्थानिक क्रिकेट सुरू असते आणि कॅरेबियन प्रीमियर लीगही सुरू असणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू हवे असतील तर बीसीसीआयला त्यांची आर्थिक सोयही करावी लागेल. भारतीय संघही या कालावधीत तीन वन-डे सामन्यांसाठी झिम्बाब्वे दौर्‍यावर असणार आहे आणि 20 ऑगस्टला हा दौरा संपणार आहे. पण, दोनच दिवसांत भारतात येऊन खेळणे खेळाडूंना शक्य नाही. दरम्यान, विराट कोहली, रोहित शर्मा व ऋषभ पंत यांना त्या दौर्‍यावर विश्रांती दिली जाऊ शकते आणि ते 22 ऑगस्टला खेळू शकतील.

Back to top button