लोकेश राहुलची आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप | पुढारी

लोकेश राहुलची आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप

दुबई; वृत्तसंस्था : इंग्लंडविरुद्ध लॉर्डस्मध्ये झालेल्या दुसर्‍या कसोटीत शतक झळकावणारा सलामी फलंदाज लोकेश राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या फलंदाजी क्रमवारीत 19 स्थानांच्या फायद्यासह 37 व्या स्थानी पोहोचला आहे. तर, कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी कायम आहे.

गेल्या आठवड्यात 56 व्या स्थानासह क्रमवारीत प्रवेश मिळवणार्‍या लोकेश राहुल ने पहिल्या डावात 129 धावांची खेळी करीत भारताच्या 151 धावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. कोहली पाचव्या स्थानी कायम असून, सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनीदेखील अनुक्रमे सहावे आणि सातवे स्थान कायम ठेवले आहे.

इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट हा दोन स्थानांच्या फायद्यासह दुसर्‍या स्थानी पोहोचला आहे. त्याचे 893 रेटिंग गुण आहेत. जे अव्वल स्थानी असलेल्या केन विल्यम्सनपेक्षा आठ गुणांनी कमी आहेत. भारताच्या रवींद्र जडेजाची अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसर्‍या स्थानी घसरण झाली आहे. भारताचा रविचंद्रन अश्‍विन या यादीत चौथ्या स्थानी आहे.

गोलंदाजी क्रमवारीत भारताचा जसप्रीत बुमराह दहाव्या स्थानी आहे. तर, लॉर्डस् कसोटीच्या दोन्ही डावांत चार-चार विकेट घेणारा मोहम्मद सिराज 18 स्थानांच्या फायद्यासह 38 व्या स्थानी पोहोचला आहे.

इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनला एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्याने भारताविरुद्ध पहिल्या डावात पाच विकेटस् मिळवले होते. तर, मार्क वूड हा 37 व्या स्थानी आहे.

Back to top button