जलतरणात महाराष्ट्राला चार सुवर्ण | पुढारी | पुढारी

जलतरणात महाराष्ट्राला चार सुवर्ण | पुढारी

गुवाहाटी : वृत्तसंस्था

खेलो इंडिया यूथ गेम्सच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणातही सुवर्णपदकांची लयलूट कायम राखली. त्यांच्या अपेक्षा फर्नांडिसने 17 वर्षांखालील गटात 400 मीटर्स वैयक्‍तिक मिडले शर्यत 5 मिनिटे 12.19 सेकंद अशा विक्रमी वेळेत पार केली. यापूर्वी तिने गतवर्षी 5 मिनिटे 13 सेकंद असा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. ती मुंबई येथे मोहन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याच वयोगटात गतवर्षी पुण्यातील स्पर्धा गाजविणाजया केनिशा गुप्‍ता हिने येथे 100 मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीचे सुवर्णपदक पटकाविले. हे अंतर तिने 59.14 सेकंदांत पूर्ण केले.

मुलांच्या 21 वर्षांखालील गटात मिहिर आम्ब्रे याने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने 100 मीटर्स बटरफ्लाय शर्यत 54.91 सेकंदांमध्ये जिंकली. पाठोपाठ त्याने आपल्या संघास 4 बाय 100 मीटर्स मिडले रिलेमध्येही विजेतेपद मिळवून दिले. मिहिर आम्ब्रे, सुचित पाटील, रुद्राक्ष मिश्रा व अ‍ॅरोन फर्नांडिस यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने ही शर्यत 3 मिनिटे 56.83 सेकंदांत पार केली. 17 वर्षांखालील गटात मात्र महाराष्ट्रास या शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी हे अंतर 4 मिनिटे 4.73 सेकंदांत पूर्ण केले.

मुलांच्या 21 वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या अ‍ॅरोन फर्नांडिस व सुश्रुत कापसे यांनी 400 मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. मुलींच्या 21 वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा तळेगावकर (19 मिनिटे 21.73 सेकंद) व मैत्रेयानी भोसले (20 मिनिटे 34.70 सेकंद) यांनी 1500 मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले.

टेनिसमध्ये संमिश्र यश

टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना संमिश्र यश मिळाले. मुलांच्या 21 वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या ध्रुव सुनीश याने एम. शशांक याचे आव्हान 6-1, 6-1 असे एकतर्फी तढतीत संपुष्ठात आणले. मुलींच्या 17 वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेने हरियाणाच्या अंजली राठी हिचा 6-0, 6-2 असा दणदणीत पराभव केला. मात्र, तिची सहकारी सई भोयार हिला कर्नाटकच्या रेश्मा मयुरीने 6-2, 6-4 असे पराभूत केले.

वेटलिफ्टिंगमध्ये प्राजक्‍ता, किरण व अभिषेकला सुवर्ण

वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या प्राजक्‍ता खालकर हिने कनिष्ठ विभागातील 64 किलो गटात सुवर्णपदक पटकाविले. तिने स्नॅचमध्ये 81 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 100 किलो असे एकूण 181 किलो वजन उचलले. कनिष्ठ मुलांच्या 73 किलो गटांत कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील अभिषेक निपणे याने सोनेरी कामगिरी केली. त्याने स्नॅचमध्ये 114 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 154 किलो असे एकूण 268 किलो वजन उचलले. शनिवारी अभिषेकने 67 किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले होते. तर, त्याचा भाऊ अनिरुद्धने 61 किलो गटात सुवर्णपदक मिळवले होते. त्याचाच सहकारी गणेश बायकर याला याच गटात कांस्यपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये 105 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 245 किलो वजन उचलले. युवा विभागाच्या 73 किलो गटात महाराष्ट्राचा किरण मराठे हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने स्नॅचमध्ये 111 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 251 किलो वजन उचलले. तो जळगाव येथे योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

Back to top button