भारतीय महिला संघाची विजयी सलामी, इंग्लंडचा ५ विकेट राखून पराभव  | पुढारी

भारतीय महिला संघाची विजयी सलामी, इंग्लंडचा ५ विकेट राखून पराभव 

कॅनबेरा : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होत असलेल्या टी-२० ट्राय सिरीजमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत इंग्लंडला १४७ धावात रोखले. त्यानंतर हे आव्हान ५ विकेट आणि ३ चेंडू राखून पार केले. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद ४२ धावा करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. 

भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंडचे अवघ्या ९ धावात पहिल्या दोन षटकात दोन फलंदाज माघारी धाडले. पण, त्यानंतर नताले सिव्हर आणि कर्णधार हिदर नाईट यांना इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी २९ धावांची भागिदारी रचली. पण, राधा यादवने २० धावांवर खेळणाऱ्या सिव्हरला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या फ्रान विल्सनला फार काही करता आले नाही. शिखा पांडेने तिला ७ धावांवर बाद करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. पण, त्यानंतर आलेल्या टॅमी बेऊमाँटने कर्णधार नाईट सोबत पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागिदारी रचत इंग्लंडला १२८ धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, कर्णधार नाईटने आपले अर्धशतक पूर्ण केले. 

अखेर शिखा पांडेने नाईटला ६७ धावांवर बाद करत भारताला दिलासा दिला. त्यानंतर दिप्ती शर्माने पिहिल्यांदा ३७ धावा करणाऱ्या टॅमी बेऊमाँटला आणि नंतर कॅथरिन ब्रंटला बाद करत इंग्लंडच्या मोठी धावसंख्या उभारण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. त्यामुळे इंग्लंडचा डाव २० षटकात ७ बाद १४७ धावात आटोपला. 

इंग्लंडचे १४८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या भारताची सुरुवात समाधानकारक झाली नाही. सलामीवीर स्मृती मानधना १५ धावा करुन माघारी परतली. पण, दुसरी सलामीवीर शेफाली वर्माने २५ चेंडूत ३० धावांची खेळी करत भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. तिला जेमिमाह रॉड्रिग्जने २७ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. पण, दोघीही पहिली १० षटके होण्याआधीच बाद झाल्या. त्या बाद झाल्या त्यावेळी भारताच्या ८२ धावा झाल्या होत्या. त्यामुळे भारताला विजयासीठी ५७ चेंडूत अजून ६६ धावांची गरज होती.

भारताची कर्णधार हरमनप्रीतने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत धावांचा पाठलाग सुरु केला. तिला तानिया भाटिया (११) आणि दिप्ती शर्माने नाबाद १२ धावा करुन उपयुक्त साथ दिली. त्यामुळे हरमनप्रीतने धावा आणि चेंडूतील अंतर आवाक्यात ठेवण्यात यश मिळवले. त्यानंतर अखेरच्या षटकात ६ धावांची गरज असताना हरमनप्रीतने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत सामना स्टाईलमध्ये संपवला.  

Back to top button