कुमार संगकारा म्हणाला, अश्‍विनला कामगिरी सुधारण्याची गरज | पुढारी

कुमार संगकारा म्हणाला, अश्‍विनला कामगिरी सुधारण्याची गरज

अहमदाबाद ; वृत्तसंस्था : भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विन याने जास्तीत जास्त ऑफ स्पिन गोलंदाजी करण्याची गरज आहे, असे मत राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा याने व्यक्‍त केले आहे.

कुमार संगकारा म्हणाला की, अश्‍विनने आपल्या गोलंदाजीत अजून सुधारणा करण्याची गरज आहे. त्याला अजून जास्त ऑफ स्पिन गोलंदाजी करणे गरजेचे आहे. अश्‍विन भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणार्‍यांच्या यादीत 442 विकेटस् घेऊन दुसर्‍या स्थानावर आहे. अश्‍विन आपल्या गोलंदाजीत वैविध्य आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, कधी कधी तो ऑफ स्पिनपेक्षा कॅरम बॉल टाकण्यावर जास्त भर देतो.

अश्‍विनबाबत संगकारा म्हणाला की, क्रिकेटच्या मैदानावर त्याने जी कामगिरी केली आहे त्यामुळे तो एक लेजंड आहे. मात्र असे असले तरी त्याला त्याच्या गोलंदाजीत अजून सुधारणा करता येऊ शकते. त्याला ऑफ स्पिनचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.’ यंदाच्या हंगामात अश्‍विनने 17 सामन्यांत 12 विकेटस् घेतल्या आहेत. फायनलमध्ये देखील त्याने ऑफ स्पिनचा मारा करण्याऐवजी कॅरम बॉलचा जास्त वापर केला. त्याने तीन षटकांत 32 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही.

राजस्थानच्या संघाने 20 षटकांत 9 बाद 130 धावा केल्या होत्या. संगकाराच्या मते या 130 धावा जास्त नव्हत्या. आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करण्याबाबतही विचार करत होतो. मात्र मैदानावर पोहोचलो त्यावेळी खेळपट्टी कोरडी होती. आम्हाला वाटले की नंतर ही खेळपट्टी संथ होत जाईल. त्यावेळी आमच्या गोलंदाजांना टर्न मिळेल. आम्हाला 160 ते 165 धावा करणे गरजेचे होते.

संगकारा पुढे म्हणाला, ‘आम्ही या खेळपट्टीवर एक विकेट गमावून 70 धावा केल्या होत्या. मात्र, संजू बाद झाल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी आमच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. नंतर आमच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये काही विकेटस् घेतल्या, मात्र शुभमन गिलला पहिल्याच षटकात मिळालेले जीवदान महागात पडले.’

जरी राजस्थानने हंगामात चांगली कामगिरी केली असली तरी संघात अनेक क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे, असे मत संगकाराने व्यक्‍त केले. तो म्हणाला, ‘आम्हाला बर्‍याच क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. फलंदाजीत रियान पराग आणि पडिक्‍कलने कधी चांगली तर कधी सुमार कामगिरी केली. त्यांना जास्त योगदान देणे गरजेचे आहे.’

Back to top button