संजय मांजरेकर : आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी कार्तिकला संधी मिळणे अवघडच | पुढारी

संजय मांजरेकर : आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी कार्तिकला संधी मिळणे अवघडच

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : आयपीएल 2022 मध्ये आरसीबीचा विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिक शानदार फलंदाजी करत आहे. त्याची फलंदाजी पाहून अनेक तज्ज्ञांनी ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत तो भारतीय संघात फिनिशरची भूमिका पार पाडू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. मात्र, टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज संजय मांजरेकर यांचे मत जरा वेगळेच आहे.

मांजरेकर यांच्या मते, आयपीएलच्या यंदाच्या सत्रात खरोखरच दिनेश कार्तिक चांगली फलंदाजी करत आहे. असे असले तरी आगामी टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत त्याला टीम इंडियात संधी मिळणे अवघडच आहे.

संजय मांजरेकर यांनी पुढे सांगितले की, सध्याचा शानदार फॉर्म कार्तिकने यापुढेही कायम ठेवला तर त्याला कदाचित टीम इंडियात स्थान मिळू शकेल. सध्या आयपीएलचा अर्धा प्रवास संपला आहे. उर्वरित सत्रात तो कशी कामगिरी करतो, हे पाहावे लागेल. मात्र, कार्तिकला भारतीय संघात स्थान मिळाले तर एका खेळाडूला बाहेर पडावे लागणार आहे. तसे पाहिल्यास टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविणे तितके सोपे नाही. कारण हा खेळाडू केवळ पाचव्या, सहाव्या अथवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

दरम्यान, कार्तिकनेही यापूर्वी म्हटले आहे की, आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माजी कर्णधार विराट कोहलीनेही टीम इंडियात स्थान मिळविण्यासाठी कार्तिक मजबूत दावेदार आहे. कार्तिकने आयपीएल 2022 मधील आठ सामन्यांत 105 ची सरासरी आणि 200 च्या स्ट्राईक रेटने 210 धावा जमविल्या आहेत. त्याने दोनवेळा सामनावीरचा पुरस्कार पटकावला आहे. आठ डावांमध्ये तो एकदाही बाद झालेला नाही.

Back to top button