पॅट कमिन्स म्हणाला, हे सगळेच माझ्यासाठी स्वप्नवत | पुढारी

पॅट कमिन्स म्हणाला, हे सगळेच माझ्यासाठी स्वप्नवत

मुंबई; वृत्तसंस्था : हे सगळे मला अविश्वसनीय वाटतेय. मी फटका मारल्यानंतर चेंडू हवेत तरंगत असल्याचे द़ृश्य मला समोर दिसत होते. अखेर माझा संघ जिंकला आणि मी भानावर आलो… हे उद्गार आहेत कोलकाता नाईट रायडर्सला बुधवारच्या लढतीत महाकठीण विजय मिळवून देणार्‍या पॅट कमिन्स याचे. अवघ्या पंधरा चेंडूंत त्याने 56 धावा झोडताना मुंबईच्या गोलंदाजीची निर्दयी कत्तल केली. अर्थात, त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 14 चेंडूच घेतले. कमिन्स नावाच्या सुनामीत मुंबईचा संघ पाचोळ्यासारखा वाहून गेला.

पॅट कमिन्स याने चार वेळा चेंडू सीमापार पाठवला आणि अर्धा डझन वेळा त्याच चेंडूला प्रेक्षकांत भिरकावून दिले. चार षटकांचा खेळ बाकी असताना कोलकाताने विजयाला गवसणी घातली. दंग होऊन हा सामना पाहत असलेले प्रेक्षक त्यानंतर भानावर आले. आपल्यासमोर घडतेय ते स्वप्न की वास्तव, असेही त्यांना क्षणभर वाटून गेले.

आयपीएलचे तब्बल पाच वेळा अजिंक्यपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स संघाची अवस्था कमिन्सच्या खेळीने दयनीय केली. एरवी ऑस्ट्रेलियाचा हा उंचपुरा खेळाडू तेजतर्रार गोलंदाजीसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, आपण धमाकेदार फलंदाजीही करू शकतो हे त्याने सिद्ध केले. त्यामुळे कोलकाता संघाला कमिन्सच्या रूपाने एक तडाखेबंद फलंदाजही नव्याने मिळाला आहे.

विशेष म्हणजे मुंबईविरुद्धच्या लढतीत कमिन्सने 49 धावांच्या मोबदल्यात दोन बळीदेखील मिळवले होते. अर्थातच तो या सामन्याचा मानकरी ठरला हे ओघाने आलेच. आता कमिन्सने के. एल. राहुल याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. राहुलने 2018 सालच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 14 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.

कमिन्सने मुंबईच्या तोंडातील विजयाचा घास काढून घेतला हे खरेच. त्यामुळेच माजी क्रिकेटपटू आणि समालोचक वीरेंद्र सेहवाग याने मुंबईच्या तोंडातून वडापाव हिसकावला असे ट्विट केले. त्यामुळे मुंबई संघाचे चाहते वीरूवर जाम भडकले. तथापि, नंतर वीरूने खुलासा केला की, मीसुद्धा रोहित शर्माच्या फलंदाजीचा चाहता आहे; कदाचित तुमच्याहूनही जास्त. मुंबईत वडापाव लोकप्रिय असल्यामुळे त्या शहराला उद्देशून मी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकूणच मुंबईच्या पराभवाचे कवित्व संपायला तयार नाही हेच खरे.

आयपीएलमधील विक्रमी अर्धशतके

* के. एल. राहुल 14 चेंडूंत दिल्लीविरुद्ध अर्धशतक (2018)

* पॅट कमिन्स 14 चेंडूंत मुंबईविरुद्ध अर्धशतक (2022)

* युसूफ पठाण 15 चेंडूंत हैदराबादविरुद्ध अर्धशतक (2014)

* सुनील नारायण 15 चेंडूंत आरसीबीविरुद्ध अर्धशतक (2017)

Back to top button