हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन लागोपाठ दारुण पराभवांमुळे निराश | पुढारी

हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन लागोपाठ दारुण पराभवांमुळे निराश

मुंबई ; वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएलमध्ये लागोपाठ दोन सामने गमावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन भलत्याच निराश झाल्या आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यांत हार स्वीकारावी लागल्यामुळे हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, 2021 च्या आयपीएलमध्येही त्यांना शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

सोमवारी लखनौविरुद्ध हैदराबादचा सामना पाहण्यासाठी काव्या मारन आवर्जून उपस्थित होत्या. या सामन्यादरम्यान त्यांच्या चेहर्‍यावर निराशा दिसली. संघातील खेळाडू जसजसे बाद होत होते, तसतशी त्यांची निराशा वाढत गेली. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयपीएल 2022 च्या लिलावापासून काव्या यांनी संघासाठी खूप काम केले आहे. प्रत्येक सामन्यात संघाचा उत्साह वाढवण्यासाठी त्या मैदानावर उपस्थित राहत आहेत.

गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा संघ सतत पराभूत होत होता. त्यानंतर व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आणि आयपीएलचे सामने सुरू असतानाच डेव्हिड वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले.

आता 2022 च्या हंगामातही ही पराभवाची मालिका संपायला तयार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन यांच्या फोटोसह लोक कॅप्शनमध्ये लिहीत आहेत की, त्यांनी वॉर्नरशी फोनवर बोलावे आणि त्याला सॉरी म्हणावे. वॉर्नरने आपल्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये हैदराबादला विजय मिळवून दिला होता. आता या हंगामात वॉर्नर दिल्लीकडून खेळताना दिसतोय.

विलियम्सनही अपयशी

हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन हाही पहिल्या दोन्ही सामन्यांत पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यात जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती, तेव्हा हा खेळाडू अवघ्या 16 धावा करून बाद झाला. हैदराबाद संघाची संपूर्ण फलंदाजी त्याच्याभोवती फिरते.

त्याचवेळी अब्दुल समद आणि उमरान मलिक या खेळाडूंची यंदाची कामगिरीही या दोन्ही सामन्यांमध्ये अजिबात बहरली नाही. विशेष म्हणजे, तब्बल 10 कोटींहून अधिक रक्कम मोजून संघात सामील झालेला निकोलस पूरनही हैदराबादला सामना जिंकून देऊ शकला नाही. त्यामुळे हा त्या संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

Back to top button