RCB vs RR : ‘आरसीबी’चा रोमहर्षक विजय | पुढारी

RCB vs RR : ‘आरसीबी’चा रोमहर्षक विजय

मुंबई ; वृत्तसंस्था : अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या थरारक लढतीत (RCB vs RR) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने राजस्थान रॉयल्सला 4 गडी राखून धूळ चारून रोमहर्षक विजय संपादला. दिनेश कार्तिक (नाबाद 44) आणि शाहबाज अहमद (45) यांनी स्फोटक खेळी करून ‘आरसीबी’च्या विजयावर मोहर ठोकली. त्यामुळे आता ‘आरसीबी’च्या खात्यातही चार गुण जमा झाले आहेत. आपल्याला आयपीएलमधील अव्वल फिनिशर का म्हणतात, हे कार्तिकने सप्रमाण सिद्ध केले.

आरसीबीने 173 धावा 19.1 षटकांत चोपल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनुज रावत यांनी 55 धावांची सलामी दिली. डू प्लेसिसने 29, तर रावतने 26 धावांचे योगदान दिले. प्लेसिसला युजवेंद्र चहलने आणि रावतला नवदीप सैनीने तंबूत पाठवले. पाठोपाठ विराट कोहली धावबाद झाला तो 5 धावांवर. यावेळी संजू सॅमसनने दाखवलेली चपळाई प्रेक्षकांना थक्क करून गेली. मग डेव्हिड विली याला चहलने एका अप्रतिम चेंडूवर खातेही खोलू दिले नाही. (RCB vs RR)

चहलचा गर्रकन वळलेला चेंडू यष्ट्या कधी उद्ध्वस्त करून गेला हे विलीला कळलेही नाही. त्यामुळे आरसीबीची अवस्था 4 बाद 62 अशी झाली. शेरफेन रूदरफोर्ड केवळ 5 धावा करून ट्रेंट बोल्टचा बळी ठरला. 87 धावा झाल्या तेव्हा आरसीबीचा निम्मा संघ गारद झाला होता. तथापि, त्यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनी खेळाचा नूरच पालटला.

आरसीबीने नाणेफेक जिंकली आणि राजस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. जोस बटलर याने केलेल्या नाबाद 70 धावांच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत तीन बाद 169 धावा ठोकल्या. त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. फलकावर 6 धावा लागलेल्या असताना सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला वैयक्तिक 4 धावांवर डेव्हिड विलीने त्रिफळाबाद केले.

त्यानंतर मात्र जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी संयमी फलंदाजी केली. फलकावर 76 धावा लागलेल्या असताना पडिक्कल बाद झाला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने त्याचा सुरेख झेल घेतला. 29 चेंडूंचा सामना करताना पडिक्कलने 37 धावा चोपल्या त्या दोन चौकार व दोन षटकारांसह. कर्णधार संजू सॅमसन झटपट तंबूत परतला. वानिंदू हसरंगाने स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याला टिपले. सॅमसनने अवघ्या 8 धावा केल्या.

सलामीवीर जोस बटलरमुळेच राजस्थानला समाधानकारक धावसंख्या गाठता आली. 47 चेंडूंचा सामना करताना बटलरने अर्धा डझन षटकार ठोकले. या खेळीत त्याने एकही चौकार लगावला नाही. आरसीबीकडून डेव्हिड विली, हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आकाशदीप आणि महम्मद सिराज यांना एकही बळी मिळवता आला नाही. एकवेळ असे वाटत होते की, आरसीबीचा संघ दीडशेचा टप्पादेखील पार करू शकणार नाही. तथापि, बटलरने सारे चित्रच पालटून टाकले. या स्पर्धेतील पहिले शतकही त्यानेच ठोकले होते.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स : 20 षटकांत 3 बाद 169.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : 19.1 षटकांत 6 बाद 173.

Back to top button