सुरेश रैना याची चेन्नई सुपर किंग्जला जाणवतेय कमतरता | पुढारी

सुरेश रैना याची चेन्नई सुपर किंग्जला जाणवतेय कमतरता

मुंबई ; वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएलमध्ये लागोपाठ तीन पराभव स्वीकारल्यामुळे गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघावर टीकेचा वर्षाव होऊ लागला आहे. सुरेश रैना याच्यासारख्या अनुभवी खेळाडूला खरेदी न केल्याची किंमत या संघाला चुकवावी लागत असून आता चाहत्यांनी रैनाला संघामध्ये घेण्याची जोरदार मागणी केली आहे.

चेन्नईचा नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने हे पद रवींद्र जडेजाकडे सोपवले. याच बदलचा मोठा परिणाम आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये दिसून आला आहे. जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत. दुसरीकडे या संघात सुरेश रैनाची उणीव दिसून येत आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये रैनासाठी कोणीही रस दाखवलेला नव्हता. चेन्नईसह कोणत्याही संघाने रैनासाठी बोली लावली नाही. त्यातच रैनाने निवृत्तीही जाहीर केलेली नाही.

रैना हा आजही आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. 205 सामन्यांत पाच हजार 528 धावा त्याच्या नावावर लागल्या आहेत. चार वेळा आयपीएल विजेता असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा रैना हा आधारस्तंभ राहिला होता. 2016 आणि 2017 मध्ये गुजरात लायन्सचे नेतृत्वही रैनाने केले.

चेन्नई संघामध्ये रैनाला स्थान न देण्यात आल्याने चेन्नईच्याच अनेक चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्टार स्पोर्टस्वरील सामन्याआधीच्या कार्यक्रम आणि चर्चासत्रामध्ये रैना सहभागी झाला होता. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना रैना स्वत: चेन्नई संघाच्या आठवणीमध्ये भावुक झाल्याचे दिसून आले. त्याने पुन्हा एकदा चेन्नईसाठी खेळण्याची आपली इच्छा बोलून दाखवली.

मी मैदानाजवळून या शोसाठी येत असताना मला वाटले की लगेच पिवळी जर्सी घालून मैदानात प्रवेश करावा, असे सुरेश रैना म्हणाला होता. आता सलग तीन पराभवानंतर चेन्नईच्या चाहत्यांनी मीम्स शेअर करत रैनाला संघात घेण्याची मागणी केली आहे. रैनासारख्या कसलेल्या खेळाडूला खरेदी करण्यासाठी कोणत्याच संघाने स्वारस्य दाखवले नाही हे आश्चर्यच.

Back to top button