PBKS vs RCB : पंजाबचे बल्‍ले बल्‍ले, आरसीबीवर पाच गड्यांनी मात | पुढारी

PBKS vs RCB : पंजाबचे बल्‍ले बल्‍ले, आरसीबीवर पाच गड्यांनी मात

मुंबई ; वृत्तसंस्था : आरसीबीने ठेवलेले 206 धावांचे मोठे आव्हान सहजगत्या पार करून किंग्ज इलेव्हन पंजाबने (PBKS vs RCB) आयपीएलमधील रविवारच्या लढतीत सुरेख विजय संपादला. त्यांनी हा सामना पाच गडी आणि सहा चेंडू राखून जिंकला. अशा प्रकारे मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाबने विजयी सलामी दिली आणि दोन गुणांची कमाईदेखील केली. शाहरूख खान (24) आणि ओडीन स्मिथ (25) यांनी अप्रतिम टोलेबाजी करून आपल्या संघाचा विजय साकार केला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएलमधील रविवारच्या लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करून केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात 205 धावा ठोकल्या. त्यानंतर 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबनेही सुरुवात धडाक्यात केली. पहिल्या सहा षटकांत त्यांनी 63 धावा चोपल्या. एवढे मोठे उद्दिष्ट समोर असल्यामुळे पंजाबचे फलंदाज गडबडून जातील, अशी अटकळ होती. तथापि, त्यांनी तोडीस तोड उत्तर दिले. फलकावर 71 धावा लागलेल्या असताना वानिंदू हसरंगा याने मयंकला आपल्या जाळ्यात फसवले आणि शाहबाज अहमदने त्याचा झेल घेतला. (PBKS vs RCB)

मयंकने 24 चेंडूंत 32 धावा करताना दोन चौकार आणि दोन षटकार हाणले. शिखर धवनने 29 चेंडूंत 43 धावा केल्या. त्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. भानुका राजपक्षने 22 चेंडूंत 43 धावा करताना दोन चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. राज अंगद याला मात्र भोपळाही फोडता आला नाही. महंमद सिराने राजपक्ष आणि अंगद यांना लागोपठच्या चेंडूंवर तंबूत पाठवले. पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल याने नाणेफेक जिंकून आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यानंतर आरसीबीने धावांचा पाऊस पाडला.

कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस याने केलेल्या 88 धावांच्या खेळीने पंजाबच्या गोलंदाजीचे कंबरडे पार मोडून टाकले. प्लेसिस याने कर्णधाराला शोभेल अशी फलंदाजी करताना तीन चौकार आणि तब्बल सात षटकार खेचले. अवघ्या 57 चेंडूंचा सामना त्याने केला आणि शतकाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे, असे वाटत होते. मात्र अर्शदीपसिंग याला उंच फटका लावण्याच्या नादात चेंडू बॅटची कड घेऊन गेला व शाहरूख खान याच्या हाती जाऊन विसावला.

Back to top button