IND vs SL 2nd TEST : ग्रीन सिटीमध्ये गुलाबी कसोटी | पुढारी

IND vs SL 2nd TEST : ग्रीन सिटीमध्ये गुलाबी कसोटी

बंगळूर वृत्तसंस्था: भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेचा दुसरा कसोटी सामना शनिवार (दि. 12) पासून सुरू होत आहे. ग्रीन सिटी म्हणून ओळख असलेल्या बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा हा डे-नाईट स्वरूपाचा कसोटी सामना गुलाबी चेंडूवर होणार आहे. भारतात झालेल्या गुलाबी चेंडूवरील दोन्ही कसोटी सामने भारताने जिंकले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय साकारला होता. त्यामुळे आता या सामन्यात भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

या सामन्यात सर्वांच्या नजरा माजी कर्णधार विराट कोहली याच्यावर असणार आहे. विराट गेल्या दोन वर्षांपासून चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाही. विराटने 2019 मध्ये कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात आपले अखेरचे शतक झळकावले होते.

त्यानंतर जवळपास 800 दिवसांमध्ये 28 डाव खेळूनही कोहलीला एकही शतक झळकावता आले नव्हते. या काळात त्याने सहावेळा पन्नाशी पार केली, परंतु त्याचे शतकामध्ये त्याला रूपांतर करता आले नाही. कोहलीकडे भारताचे नेतृत्व होते. त्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीबाबत जास्त कुणी बोलत नव्हते. पण आता कोहलीकडे भारताचे एकही कर्णधारपद राहिलेले नाही.

दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपदही सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्माकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

रोहित शर्मा व मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला खेळेल. त्यानंतर विराट कोहली, हनुमा विहारी, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्चिन अशी फलंदाजीची क्रमवारी असेल. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी हे जलदगती मार्‍याची जबाबदारी सांभाळतील.

आता दुसर्‍या कसोटीसाठी भारतीय संघात अक्षर पटेलचा समावेश केला गेला आहे आणि कुलदीप यादवला रिलिज करण्यात आले आहे. अक्षरच्या येण्याने बंगळूर कसोटीत जयंत यादव याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त भारतीय संघात काही बदल होतील अशी अपेक्षा नाही. परंतु खेळपट्टीवरील गवत पाहता मोहम्मद सिराजलाही संधी मिळू शकते.

दुसरीकडे दिमूथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेला पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवाला मागे टाकून मैदानात उतरावे लागेल. भारतीय संघाच्या तुलनेत ते प्रत्येक क्षेत्रात मागे पडले आहेत. त्यांचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराच्या जागी दुष्मंथा चमिरा याला संधी मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर अनुभवी अँजेलो मॅथ्यूजकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

कसोटी चॅम्पियनशिपमधील भारताचे सात सामने उरले असून मायदेशातील ही त्यांची या वर्षातील शेवटची कसोटी आहे. यानंतर भारतीय संघ दोन कसोटी खेळण्यासाठी बांगलादेशला जाणार आहे, तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया भारतात चार सामने खेळणार आहे. याशिवाय इंग्लंडविरुद्धचा एक उरलेला सामनाही भारताला खेळायचा आहे. फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला हे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

दुसरा कसोटी सामना

  • स्थळ : चिन्नास्वामी स्टेडियम बंगळूर
  • वेळ : दुपारी 2 वाजलेपासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क

Back to top button