Russia-Ukraine war : रशियन खेळाडूकडून खेळ भावनेची पायमल्‍ली | पुढारी

Russia-Ukraine war : रशियन खेळाडूकडून खेळ भावनेची पायमल्‍ली

दोहा ; वृत्तसंस्था : सध्या सगळ्या जगाचे लक्ष रशिया-युक्रेन युद्धाकडे (Russia-Ukraine war) लागले आहे, सगळ्या जगभरातून या युद्धाबाबत निषेध व्यक्‍त होत आहे; तर अनेक राष्ट्रांनी रशियावर निर्बंधही लादले आहेत. तसेच रशियामध्ये देखील अनेक सामान्य नागरिक तसेच प्रसिद्ध खेळाडूंनी या युद्धाबद्दल निषेध व्यक्‍त केला आहे. मात्र क्रीडाविश्‍वाला धक्‍का देणारा एक प्रकार समोर आला आहे.

शनिवारी कतारमध्ये झालेल्या एका स्पर्धेच्या फायनलनंतर व्यासपीठावर युक्रेनियन खेळाडूच्या बाजूला उभे राहताना रशियन जिम्नॅस्टने त्याच्या कपड्यांवर युद्धाचे समर्थन करणारे झेड हे चिन्ह लावल्याचा प्रकार घडला. या धक्‍कादायक प्रकारानंतर त्या रशियन खेळाडूची चौकशी केली जाणार असून त्या खेळाडूवर जगभरातून जोरदार टीका केली जात आहे.

पॅरलल बार या क्रीडा प्रकाराच्या फायनलमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, कुलियाकने त्याच्या छातीवर Z अक्षर चिकटवले आणि तो युक्रेनच्या सुवर्णपदक विजेत्या इलिया कोव्हटुनच्या बाजूला व्यासपीठावर जाऊन उभा राहिला. व्यासपीठावर उभे राहिल्यावर रशियाच्या इव्हान कुलियाकच्या कपड्यांवर ते झेड अक्षर दिसत होते.

दरम्यान, हा विश्‍वचषक ही रशियन आणि बेलारशियन खेळाडूंसाठी स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम संधी होती. सोमवारपासून त्या देशांतील सर्व खेळाडू, अधिकारी आणि परीक्षकांवर बंदी घालण्यात येणार आहे. युक्रेनवर रशियन आक्रमण झाल्यापासून अनेक खेळांनी बेलारशियन आणि रशियन खेळाडूंशी संबंध तोडले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने दोन देशांतील खेळाडूंना 2022 पॅरालिंपिक खेळांमध्ये तटस्थ ध्वजाखाली भाग घेण्याची परवानगी दिली होती. परंतु नंतर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘झेड’ अक्षराचा अर्थ काय? (Russia-Ukraine war)

युद्धाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘झेड’ अक्षर असलेले कपडे आणि बॅज घातलेले याआधी दिसले आहे. झेड हे अक्षर रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या समर्थनाचे चिन्ह बनले आहे. रशियाच्या लष्करी वाहनांवर हे चिन्ह वापरले जात आहे. रशियातील लोक युद्धाला समर्थन देण्यासाठी हे चिन्ह वापरत आहेत. रशियाचे राजकारणी सामान्य नागरिकेह हे चिन्ह मिरवत आहेत.

Back to top button