अतिरिक्त पदभार देण्यास कृषी संचालकांचीच कमतरता; कृषी विभाग सापडला कात्रीत | पुढारी

अतिरिक्त पदभार देण्यास कृषी संचालकांचीच कमतरता; कृषी विभाग सापडला कात्रीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कृषी आयुक्तालयातील संचालकांच्या रिक्त पदांवरून त्यांचा पदभार द्यायचा कोणाकडे? असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. ऐन खरीप हंगामाच्या तयारीत एकाच अधिकार्‍यावर कामाचा ताण आणि अतिरिक्त पदभार देण्यास संचालकांची कमतरता, अशा दुहेरी अडचणीत सध्या कृषी विभाग आलेला आहे. त्यामुळे मंत्रालयस्तरावरूनच पदभारावर शिक्कामोर्तब अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

कृषी विस्तार व संचालक पदावरून तत्कालीन संचालक दिलीप झेंडे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा अतिरिक्त पदभार कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. मुळात निविष्ठा विभागावर खरीप हंगामाची बी-बियाणे, खते, कीटकनाशकांच्या पुरवठ्याची जबाबदारी राहते. त्यांच्याकडे कृषी विस्ताराचे कामही देण्यात आलेले आहे. त्याबाबत कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शासनास अहवाल दिला असून, वरिष्ठ अधिकार्‍यांनीच अतिरिक्त पदभार सांभाळला पाहिजे, अशी ठोस भूमिका घेतल्याचे समजते.

दुसरी बाब म्हणजे कृषी आयुक्तालयातील कार्यरत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) विभागाचे कृषी संचालक दशरथ तांभाळे, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे तसेच मृदसंधारण व पाणलोटक्षेत्र व्यवस्थापनाचे कृषी सहसंचालक पांडुरंग शेळके हे मे महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. शेळके यांच्याकडे नियोजन सहसंचालक पदाचाही अतिरिक्त पदभार आहे. म्हणजे, आयुक्तालयस्तरावर दोन कृषी संचालक आणि दोन कृषी सहसंचालक ही पदे रिक्त होत आहेत.

तीन वर्षे पूर्ण नसल्याने अडचण

कृषी सहसंचालक या पदावर ज्या अधिकार्‍याची तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत, अशा अधिकार्‍याकडे कृषी संचालकपदाची धुरा दिली जाते. या अटींची पूर्तता करणारा सहसंचालक तूर्तास नसल्याने विस्तार संचालकांच्या पदभाराच्या अडचणीप्रमाणेच पुन्हा महिनाअखेरीस आत्मा आणि प्रक्रिया संचालकपदाचा पदभार कोणाकडे द्यायचा? असा प्रश्न उभा राहिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कृषीचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलाश मोते यांच्यावर यातील कोणती जबाबदारी दिली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे राहील.

हेही वाचा

Back to top button