पुढारी ऑनलाईन डेस्क
धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध चांगली खेळी केली नाही आणि त्याने चाहत्यांची निराशा केली. (Rohit Sharma)
या सामन्यात रोहित शर्माने 9 चेंडूंचा सामना करत एका चौकाराच्या मदतीने 5 धावा केल्या. रोहित शर्माला दुष्मंथा चमीराने बाद केले. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चमीराने रोहितला आपला बळी बनवण्याची ही सहावी वेळ होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक वेळा क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये हिटमॅनला बाद करणारा तो गोलंदाज आहे.
रोहितने केविन ओब्रायनला टाकले मागे…
रोहित शर्मा तिसऱ्या T20 सामन्यात 5 धावा काढून बाद झाला. याचबरोबर त्याच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होण्याच्या बाबतीत रोहित पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने केविन ओब्रायनला मागे टाकले आहे.
रोहित शर्मा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 45व्यांदा एकेरी धवसंख्येवर बाद झालाय. त्याच्याआधी केविन ओब्रायनच्या नावावर हा विक्रम नोंदवला होता. तो 44 वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झालाय. तर याबाबतीत मुशफिकुर रहीम (41) तिसऱ्या आणि शाहिद आफ्रिदी (40) चौथ्या क्रमांकावर आहे. (Rohit Sharma)
रोहितने शोएब मलिकचा विक्रम मोडला
रोहित शर्माच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा 125 वा सामना होता. तो आता क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. त्याने पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकला मागे टाकले आहे. मलिकने आतापर्यंत एकूण 124 सामने खेळले आहेत. दुसरीकडे, जर आपण रोहित शर्माच्या T20 कारकिर्दीबद्दल चर्चा केली तर त्याने या 125 सामन्यांमध्ये 32.48 च्या सरासरीने 3313 धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर चार शतके आहेत. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 118 धावा आहे.
हेही वाचल का?