नाशिक : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पन्नाची चिन्हे ; 2. 11 लाख हेक्टरवर लागवड | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पन्नाची चिन्हे ; 2. 11 लाख हेक्टरवर लागवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात या वर्षी उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात जवळपास 25 टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख 70 हजार असून, या वर्षी 2 लाख 11 हजार 762 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. यामुळे या हंगामात नाशिक जिल्ह्यात खरीप, लेट खरीप व उन्हाळ मिळून तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे.

नाशिक हा कांदा उत्पादनात देशातील अग्रेसर जिल्हा आहे. जिल्ह्याच्या एकूण उत्पादनापैकी 15 ते 20 टक्के उत्पादन एकट्या नाशिक जिल्हयात होते. तसेच जून ते ऑक्टोबरपर्यंत नाशिक जिल्हयातील बाजार समित्यांमधील कांदा आवकेवरून देशातील कांद्याचे दर ठरत असतात. नाशिक जिल्ह्यात पोळ व लाल कांद्याचे सर्वसाधारण क्षेत्र कमी असले तरी उन्हाळ कांद्याचे क्षेत्र अधिक आहे. पर्जन्यछायेतील व सिंचनाची व्यवस्था मर्यादित असलेल्या दुष्काळप्रवण तालुक्यांमध्ये विशेषत: सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, कळवण, मालेगाव या तालुक्यांमध्ये कांद्याचे पीक घेतले जाते. निफाड तालुक्यातही उसाच्या क्षेत्रात घट झाल्यानंतर त्याचाही मोठा भाग कांदा पिकाकडे वळला आहे.

यामुळे जिल्हयातील कांदा पिकाचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. मागील वर्षी उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांचा तुटवडा झाल्याने कांदा रोपाच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे जिल्हयात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 1 लाख 60 हजार हेक्टरवर लागवड झाली होती. या वर्षी सिन्नरवगळता इतर दुष्काळी तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. गव्हाचे दर स्थिर असल्यामुळे शेतकर्‍यांनी उपलब्ध पाण्यातून कांदा पिकाला प्राधान्य दिल्याने या वर्षी उन्हाळ कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे.

जिल्ह्यातील कांदा
लागवड दृष्टिक्षेपात..

पोळ कांदा……………..29,338 हेक्टर

लाल कांदा…………….60,843 हेक्टर
उन्हाळ कांदा…………2,11,762 हेक्टर

हेही वाचा :

Back to top button