लोणावळा : युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीसाठी कुटुंबाने देव ठेवले पाण्यात | पुढारी

लोणावळा : युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीसाठी कुटुंबाने देव ठेवले पाण्यात

लोणावळा, पुढारी वृत्‍तसेवा : लोणावळ्यातील मोनिका दाभाडे ही सहा वर्षापासून वैद्यकीय अभ्‍यासक्रमासाठी युक्रेन गेली आहे. ती पुढील दोन महिन्यात शिक्षण संपून भारतात परतणार होती. परंतु आता रशिया, युक्रेन या दोन देशात युद्ध सुरू झाले आहे.

दरम्‍यान, पुणे जिल्ह्यातील 77 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. यामध्ये लोणावळ्यातील दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. महक प्रदीप गुप्ता आणि मोनिका मारुती दाभाडे अशी त्यांची नावे असून या दोघीही वैद्यकीय क्षेत्राची पदवी मिळवून मायदेशात परतणार होत्या.

परंतु रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्‍याने या दोन्ही मुली तेथेच अडकल्या. सध्या त्या युद्धभूमी पासून 60 किलोमीटर लांब ओडीसा शहरात आहेत. परंतु आता युद्धाचे ढग या शहरावरदेखील दाटून आले आहे.

यामूळे त्‍यांचा परिवार चिंतेत असून त्‍यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. दाभाडे परिवारावर कर्ज असून मारूती दाभाडे हे खासगी वाहन चालक आहेत. आता मात्र मुलीला भारतात परत आणायचे आहे परंतु त्यांच्यापुढे मोठा पेच उभा राहिला आहे.

यामध्ये लोणावळा शहर पत्रकार संघाने पुढाकार घेत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली आहे. शासनाने प्रयत्न करून मुलीला सुखरूप घरी घेऊन यावे अशी आर्त हाक दाभाडे परिवार करीत आहे.

हे ही वाचा  

Back to top button