कोल्हापूर : आंदोलकांना त्रास झाल्यास गाठ आमच्याशी

कोल्हापूर : आंदोलकांना त्रास झाल्यास गाठ आमच्याशी
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खा. संभाजीराजे यांच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणाला राज्यभरातून उत्स्फूर्त पाठबळ मिळत आहे. संभाजीराजेंसोबत शेकडो कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा दुसरा दिवस उगवला तरीही राज्य शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. मराठा आंदोलकांना यामुळे कसल्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने रविवारी दिला.

आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील स्मारकाच्या साक्षीने सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. रविवारी कर्नाटकातील समाजबांधवांनी उपोषणात सहभाग नोंदविला. या उपोषणाला विविध ग्रामपंचायती, संस्था, संघटना, तालीम मंडळे, तरुण मंडळे, पक्ष, समाज संघटना यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक यांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदवला. ते म्हणाले, भाजप सरकारने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या. त्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद पाडल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलन आता मागे घेऊन चालणार नाही; अन्यथा आपण फसलो जाऊ. मागण्या पूर्ण करण्यासाठी एकसंघ लढण्याची गरज आहे. भाजप सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक होते, पण महाविकास आघाडीचे सरकार उदासीन आहे.

बेळगावचे माजी महापौर शिवाजीराव सुंठकर, पंचायत समिती सदस्य सुनील अष्टेकर, मुनगावचे सरपंच भालचंद्र पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पुंडलिक पावशे, उमेश पोर्लेकर, आकाश शेलार, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, डॉ. संतोष निंबाळकर, महेश पाटील, कादर मलबारी, बंकट थोडगे, कॉ. बाबुराव तारळी, बी. जी. मांगले, सुहास शिंदे, सुरेश पाटील, ऋषी साजणे, विनायक पाटील, रवींद्र खोत, अश्विनी वागळे, अंकुर कांबळे यांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदविला.

यांनी दिला पाठिंबा

लिंगायत समाज कोल्हापूर, जागरण फौंडेशन, महाराष्ट्र सेवा संघ, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, बहुजन परिवर्तन पार्टी, महाराष्ट्र राज्य ऑटोमोबाईल मेकॅनिक, संयुक्त रविवार पेठ, प्रहार जनशक्ती पक्ष, भीम ब्रिगेड संघटना, राजर्षी छत्रपती शाहू दिव्यांग संघटना, छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ हळदी, मराठा जागृती मंच.

आज रिक्षा रॅली

शहरातील रिक्षा मालक आणि चालक मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी शहरातून सोमवारी दुपारी 12 वाजता रॅली काढण्यात येणार आहे. याची सुरुवात छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मारकास अभिवादन करून होणार आहे. दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, शिवाजी चौक, भवानी मंडप, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वारोड, पापाची तिकटी, भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौक मार्गे पुन्हा दसरा चौकात ही रॅली येणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रणजित पोवार यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news