India vs West Indies : ‘सूर्य’ तळपला, ‘कृष्णा’ पावला! | पुढारी

India vs West Indies : ‘सूर्य’ तळपला, ‘कृष्णा’ पावला!

अहमदाबाद ; वृत्तसंस्था : सूर्यकुमार यादव (64) व के.एल. राहुल (49) यांच्या उपयुक्‍त फलंदाजीनंतर प्रसिद्ध कृष्णा (12 धावांत 4 विकेट) याच्यासह अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या बळावर भारताने दुसर्‍या वन-डेत (India vs West Indies) वेस्ट इंडिजवर 44 धावांनी मात केली. याबरोबरच तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेत वर्षातील पहिली मालिका जिंकली.

विजयासाठी 238 धावांचे टार्गेट असताना वेस्ट इंडिजने 46 षटकांत सर्वबाद 193 धावा केल्या. होप व ब्रेंडॉन किंग यांनी डावास सुरुवात केली. मात्र, प्रसिद्ध कृष्णाने प्रथम किंग (18) व त्यानंतर अनुभवी ड्वेन ब्राव्हो (1) यांना बाद केले. त्यानंतर चहलने शाई होपला (27) बाद करून पाहुण्यांची 3 बाद 52 अशी बिकट स्थिती केली. यानंतर कृष्णाने पूरनला (9) रोहितकरवी झेलबाद केलेे.

शार्दुल ठाकूरने धोकादायक होल्डरला (2) हुडाकरवी झेलबाद करून पाहुण्यांची 5 बाद 76 अशी दयनीय स्थिती केली. ब्रूक्स व हुसेन यांनी 28 व्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले. ही जोडी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच हुडाने यादवकरवी ब्रूक्सला झेलबाद केले. त्याने 2 चौकार व 2 षटकारांसह 44 धावा काढल्या. तर एका बाजूने धावा वाढवणार्‍या अकिल हुसैनला ठाकूरने पंतकरवी 34 धावांवर झेलबाद केले. (India vs West Indies)

ओडेन स्मिथने (24) फटकेबाजी करून टीम इंडियाची धडधड वाढविली. मात्र, सुंदरने कोहलीकरवी त्याला झेलबाद केले. कृष्णाने रोचला (0) पायचित करून भारताच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. कृष्णाने 9 षटकांत 12 धावांत 4 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 237 धावा काढल्या. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा (5), ऋषभ पंत (18) व विराट कोहली (18) हे लवकर बाद झाल्याने भारताची 3 बाद 43 अशी बिकट स्थिती झाली.

राहुल व सूर्यकुमार यांनी संघाचा कोसळणारा डाव सावरताना चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी साकारली. मात्र, राहुल 49 वर धावबाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारने वन-डे कारकिर्दीतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. हे अर्धशतक त्याने 70 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. मात्र, तो फैबियन अ‍ॅलनच्या गोलंदाजीवर 64 धावा काढून बाद झाला.

राहुल व सूर्यकुमार परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (24) व दीपक हुडा (29) यांनी उपयुक्‍त धावा काढल्या. तर शार्दुल (8) व सिराज (3) हे लवकर बाद झाले. युजवेंद्र चहलने शेवटच्या क्षणी 11 धावांची नाबाद खेळी केली. शेवटी भारताने 9 बाद 237 धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजच्या वतीने जोसेफ व ओडियन स्मिथ यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या.

भारत : रोहित शर्मा झे. होप गो. रोच 5, ऋषभ पंत झे. होल्डर गो. स्मिथ 18, विराट कोहली झे. होप गो. स्मिथ 18, राहुल धावबाद हुसेन-अ‍ॅलेन 49, सूर्यकुमार झे. जोसेफ गो. अ‍ॅलेन 64, वॉशिंग्टन सुंदर झे. जोसेफ गो. हुसेन 24, दीपक हुडा झे. हुसेन गो. होल्डर 29, शार्दुल ठाकूर झे. ब्रूक्स गो. जोसेफ 8, सिराज झे. होप गो. जोसेफ 3, चहल नाबाद 11, प्रसिद्ध कृष्णा नाबाद 0, अवांतर 8, एकूण 50 षटकांत 9 बाद 237 धावा. विकेट : 1/9, 2/39, 3/43, 4/134, 5/177, 6/192, 7/212, 8/224, 9/226. गोलंदाजी : केमार रोच 8-0-42-1, जोसेफ 10-0-36-2, स्मिथ 7-0-29-2, होल्डर 9-2-37-1, हुसेन 6-0-39-1, अ‍ॅलेन 10-0-50-1

वेस्ट इंडिज : शाई होप झे. यादव गो. चहल 27, ब्रेंडॉन किंग झे. पंत गो. कृष्णा 18, ब्राव्हो झे. पंत गो. कृष्णा 1, ब्रूक्स झे. यादव गो. हुडा 44, पूरन झे. रोहित गो. कृष्णा 9, होल्डर झे. हुडा गो. शार्दुल 2, अकिल हुसेन झे. पंत गो. ठाकूर 34, फेबियन अ‍ॅलेन झे. पंत गो. सिराज 13, ओडियन स्मिथ झे. कोहली गो. सुंदर 24, अल्झारी जोसेफ नाबाद 7, रोच पायचित गो. कृष्णा 0, अवांतर 14, एकूण 46 षटकांत सर्वबाद 193. विकेट : 1/32, 2/38, 3/52, 4/66, 5/76, 6/117, 7/159, 8/159, 9/193, 10/193. गोलंदाजी : सिराज 9-1-38-1, शार्दुल 9-1-41-2, कृष्णा 9-3-12-4, चहल 10-0-45-1, सुंदर 5-0-28-1, हुडा 4-0-24-1.

Back to top button