Australian Open : अँडी मरे, मेदवेदेव दुसर्‍या फेरीत | पुढारी

Australian Open : अँडी मरे, मेदवेदेव दुसर्‍या फेरीत

मेलबर्न ; वृत्तसंस्था : पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चुरशीच्या सामन्यात विजय मिळवत अँडी मरेने मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस (Australian Open) स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. या स्पर्धेसाठी मरेला वाईल्ड कार्ड प्रवेश मिळाला आहे. मरेने 21 व्या मानांकित निकोलोज बेसिलाशविलीला 6-1, 3-6, 6-4, 6-7, 6-4 असे नमविले.

2018 मध्ये शस्त्रक्रियेमुळे तो या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळला नव्हता. 2019 मध्ये पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत त्याला पहिल्या फेरीतच पराभूत व्हावे लागले. 2020 मध्ये दुखापत आणि 2021 कोरोना प्रादुर्भावामुळे तो स्पर्धेपासून दूर राहिला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत हा मरेचा हा 49 वा विजय आहे.

नोव्हाक जोकोव्हिच न खेळल्याने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणार्‍या दुसर्‍या मानांकित दानिल मेदवेदेवने दुसर्‍या फेरीत धडक मारली. मेदवेदेवने हेन्री लाकसोनेनला 6-1, 6-4, 7-6 असे पराभूत केले. पाच सेटपर्यंत चाललेल्या अन्य लढतीत नवव्या मानांकित फेलिक्स ऑगर-अलियासिमने एमिल रुसुवुओरीला 6-4, 0-6, 3-6, 6-3, 6-4 असे पराभूत केले. याशिवाय एंड्री रुबलेव, यानिक सिनेर, डिएगो श्‍वार्ट्जमॅन, रॉबर्टो बतिस्ता आणि मारिन सिलिच यांनीदेखील दुसरी फेरी गाठली.

महिला गटात मेडिसन इंग्लिस, मुगुरुजा विजयी (Australian Open)

महिलांमध्ये कॅनडाच्या 19 वर्षीय लैला फर्नांडिजला 133 वी मानांकित वाईल्ड कार्ड खेळाडू मेडिसन इंग्लिसने 6-2, 6-4 असे पराभूत केले. तिसर्‍या मानांकित गर्बाईन मुगुरुजाने क्लारा बुरेलला 6-3, 6-4 असे नमविले. सहाव्या मानांकित एनेट कोंटावेटने कॅटरिना सिनियाकोवाला 6-2, 6-3 असे पराभूत केले.

माजी अमेरिकन ओपन चॅम्पियन सॅम स्टोसूरने रॉबिन अँडरसनला 6-7, 6-3, 6-3 असे नमवित आगेकूच केली. दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्विटोवाला रोमानियाच्या सोराना क्रिस्टियाकडून 6-2, 6-2 असे पराभूत व्हावे लागले.

Back to top button