extortion case : सुकेश चंद्रशेखरविरोधात नोरा फतेही बनणार सरकारी साक्षीदार | पुढारी

extortion case : सुकेश चंद्रशेखरविरोधात नोरा फतेही बनणार सरकारी साक्षीदार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : उद्योगपती शिवइंदर सिंग यांची दोनशे कोटी रुपयांची फसवणूक केलेला महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याविरोधात सरकारी साक्षीदार बनण्यास अभिनेत्री नोरा फतेही तयार झाली असल्याची माहिती बुधवारी सूत्रांनी दिली. फसवणुकीबरोबर हवालाच्या अनेक प्रकरणांमध्ये सुकेश आरोपी आहे. (extortion case)

हवाला प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सुकेशने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तसेच नोराचे नाव घेतले होते. जॅकलिनला कोट्यवधी रुपयांच्या वस्तू भेटीदाखल दिल्याची कबुलीही सुकेशने दिली होती. तपास संस्थांनी आरोपपत्रात नोरा फतेहीचे नाव घातलेले आहे.

दुसरीकडे नोराने चौकशीवेळी आपण निर्दोष असल्याचे ईडीला सांगितले होते. याच दरम्यान आता नोरा सुकेशच्या विरोधात सरकारी साक्षीदार बनणार असल्याने हवाला प्रकरणाच्या अनुषंगाने नवीन खुलासे होणार आहेत.

extortion case : सुकेश आहे तरी कोण?

सुकेश मुळात मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. या पठ्ठ्याने १२वीनंतर शिक्षण सोडून दिले. बंगळुरू येथील भवानीनगरचा रहिवाशी असलेल्या सुकेशने सुरुवातीला बांधकाम व्यवसायात नशिब आजमावून पाहिले.

वयाच्या १७व्या वर्षी सुकेशने भामटेगिरी सुरू केली. फोनवरून वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत पैसे उकळण्याचा उद्योग त्याने सुरू केला.

सरकारी कार्यालयातील कामे करून देतो असे सांगत त्यांने १००लोकांची फसवणूक केली होती. २००७मध्ये त्याला पहिल्यांदा अटक झाली. सुटका झाल्यानंतर त्याने फसवणुकीचा उद्योग सुरूच ठेवला. अजून काही सहकारी सामील करून त्याने स्वतःचे एक रॅकेटच बनवले.

त्याने आतापर्यंत राजकारणी, व्यावसायिक अशा अनेकांना टोप्या घातल्या आहेत. सुकेशला बऱ्याच वेळा अटकही झालेली आहे. पण सुटका होताच तो पुन्हा आपले उद्योग सुरू करत असे. सुकेशने वयाच्या १७व्या वर्षी पहिली फसवणूक केली होती.

Back to top button