‘नाटू नाटू’ गीताला कोल्हापुरी इफेक्ट | पुढारी

‘नाटू नाटू’ गीताला कोल्हापुरी इफेक्ट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  भानू अथ्थया यांना ‘गांधी’ चित्रपटातील वेषभूषेसाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मान्मित करण्यात आले होते. यानंतर ‘आरआरआरर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गीतावर कोल्हापूरच्या कलेची मोहर उमटली आहे. या गीतामध्ये नव्याने नावारूपाला आलेले व्हिज्युअल इफेक्टसचे काम कोल्हापूरच्या कलाकारांनी केले आहे. त्यामुळे भानू अथ्थयानंतर ‘नाटू नाटू’ गीताच्या निमित्ताने कोल्हापूरचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांनी आता बॉलीवूडवर आपली छाप पाडली आहे. बाहुबलीनंतर अनेक दाक्षिणात्य चित्रपट हिंदी भाषेत डब केले जात आहेत. या चित्रपटांची प्रेक्षकांवर चांगलीच मोहिनी पडली आहे. यानंतर आलेल्या पुष्पा आणि एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गीताने प्रेक्षकांना चांगलेच थिरकवले. चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात झाले आहे. सध्या चित्रपटातील अनेक द़ृश्यांना व्हीएफएक्स इफेक्ट दिले जातात. या गीतासाठी तसेच काही साहसी द़ृश्यांवर कोल्हापुरातील मधुर चांदणे, विशाल गुडूळकर, वसीम मुलाणी यांनी काम केले. यात मातीचा धुरळा उडवण्याचे द़ृश्य, चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन हे व्हीएफएक्सने तयार केले आहेत.

‘गांधी’ चित्रपटासाठी ऑस्कर मिळवलेल्या भानू अथ्थया यांच्या काळात फारसे तंत्रज्ञान उपलब्ध नसताना त्यांनी त्या काळात ऑस्कर नामांकन मिळवले. आता चित्रपटातील बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून कोल्हापुरातील तरुणांनी दिलेल्या योगदानाने कोल्हापूरचे नावही जागतिक पातळीवर झळकले आहे.

एस. एस. राजमौली दिग्दर्शित बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपटाने जगभर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यातील ‘नाटू नाटू’ गीतासह काही द़ृश्यांना गुडूळकर, चांदणे, मुलाणी यांनी त्यांच्या 50 विद्यार्थ्यांच्या मदतीने स्पेशल इफेक्टस् दिले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये मुंबईतील एका प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून हे काम केले गेले. गीतावर नृत्य करताना उडालेल्या मातीचा इफेक्ट, तसेच चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनमधील आगीतील पुतळा अंगावर पडतानाचा सीन यांनाही व्हीएफएक्स देण्याचे काम या तरुणांनी केले आहे. या कलाकारांनी यशराज, रेड चिलीज, प्राईम फोकस यांसारख्या बड्या कंपन्यांसोबतही त्यांनी काम केले आहे.

गीताच्या यशात कोल्हापूरकरांचाही मोठा वाटा

जगभरात लोकप्रिय झालेले आणि मानाचा ऑस्कर जिंकलेले ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गीताच्या यशामध्ये कोल्हापूरकरांचाही मोठा वाटा आहे. नाटू नाटूसह जननी गीतातील स्पेशल व्हिज्युअल इफेक्टस् (व्हीएफएक्स) देण्याचे काम येथील विशाल गुडूळकर, मधुर चांदणे, वसीम मुलाणी यांच्या रुईकर कॉलनी येथील की फ—ेम येथे करण्यात आले आहे.

गेली सतरा वर्षे व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा अनुभव आहे. त्यामुळे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये व्हीएफएक्स तंत्राचा अवलंब केला आहे. आरआरआर चित्रपटासाठी काही गाणी तसेच शेवटचा फाईटसीनमध्ये व्हीएफएक्स इफेक्ट देण्यात आला. यातील गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे. यात आपला असणारा वाटा अमूल्य आहे.
– मधुर चांदणे

Back to top button