अमिताभ बच्चन यांचे विठ्ठल विठ्ठल! | पुढारी

अमिताभ बच्चन यांचे विठ्ठल विठ्ठल!

मुंबई : वृत्तसंस्था

एरवी या काळात महाराष्ट्रात विठ्ठलाच्या वारीचे वारे असते, पण यंदा कोरोनामुळे वारी झाली नाही. आषाढी एकादशी आली आणि गेली. मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल असलेल्या अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी कामिका एकादशीच्या मुहूर्तावर पुन्हा विठ्ठलनामाचा गजर केला आहे! मूळच्या गंगा किनारेवाल्याने या महानायकाने चंद्रभागेच्या तिरावर… विटेवर उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या महाआराध्याला दीड महिन्यात सहावेळा दंडवत घातला आहे…  

बच्चन यांनी गुरुवारी दुपारी सोशल मीडियावर विठ्ठल-रखुमाईचे चित्र शेअर केले. ‘सर्व काही ईश्वरचरणी समर्पित’ अशी एक ओळ त्यावर लिहून सुखकर्ता आणि दु:खहर्ता तोच एक आहे, असे भाव व्यक्त केले आहेत.

विशेष म्हणजे गेल्या दीड महिन्यादरम्यान बच्चन यांनी विठ्ठल रखुमाईचे हे चित्र सहा वेळा शेअर केले आहे.  शनिवारी अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना या रुग्णालयात दाखल केलेले आहे. अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी रुग्णालयातूनच ‘विदुर नीती’तील एक श्लोक शेअर केला होता. सर्वांशी इर्षा, सर्वांची घृणा करणारे असंतुष्ट, तापट, संशयी आणि परावलंबी असे सहा प्रकारचे लोक नेहमीच दु:खी असतात म्हणून या सहाही प्रवृत्तींपासून दूर राहायला हवे, अशा आशयाचा हा श्लोक होता. विदुरनीतीलगोलग विठ्ठलाचे चित्र शेअर करून विठ्ठलाला जो अनन्यभावे शरण जातो, त्याच्या ठायी या सहाही दुष्प्रवृत्ती फिरकत नाहीत, असेच महानायकाला सांगायचे आहे… गेट वेल सून बिग बी!

आणखी 7 दिवस रुग्णालयात

बच्चन बापलेकांना आणखी 7 दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे. दोघांच्या प्रकृतीत सुधारणा आहे, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

Back to top button