‘सुशांत आणि सारा इतक्या प्रेमात होते, की तसा आदर आजकालच्या नात्यात दिसतही नाही!’  | पुढारी

'सुशांत आणि सारा इतक्या प्रेमात होते, की तसा आदर आजकालच्या नात्यात दिसतही नाही!' 

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवुडचा प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी अभिनेता सुशांतसिंह राजपूतने वयाची पस्तिशीही पार होण्याच्या आधीच १४ जूनला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तथापि त्याची ही आत्महत्या होती की हत्या यावरून सुरु झालेला अध्याय आता सीबीआय चौकशीपर्यंत येऊन पोहोचला आहे. 

एखाद्या सामन्याला चेंडूनजीक कलाटणी मिळावी त्याप्रमाणे सुशांत प्रकरणाला वळण मिळत आहे. त्यामुळे दररोज नवीनवीन सनसनाटी खुलासा होत आहे. आता यामध्ये सुशांतचा मित्र सॅम्युएल हाकीपची भर पडली आहे. त्याने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

त्याने इन्स्टाग्राम पोस्टवर केलेल्या पोस्टमध्ये सुशांत आणि सारा अली खान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचा दावा केला आहे. या उभय जोडीने केदारनाथ चित्रपटात एकत्रित काम केले होते. सॅम्युएलने सुशांत आणि सारा सोनचिडीया चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत एकमेकांच्या प्रेमात होते असा दावा केला आहे. बॉलिवुडमधील माफियांमुळे साराने सुशांतशी ब्रेकअप केल्याचेही त्याने म्हटले आहे. 

सॅम्युएल आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, मला केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशनवेळचा कालखंड चांगलाच लक्षात आहे. सुशांत आणि सारा एकमेकांच्या पूर्णतः प्रेमात होते. ते तुटण्याच्या पलीकडे नात्यात होते. हे खूपच प्युअर आणि त्यामध्ये लहान मुलांप्रमाणे भावभावना होत्या. ते दोघेही नात्याचा जबरदस्त आदर करत होते जो आजकालच्या नात्यात अभावानेच दिसून येतो. सारा सुशांतसह त्याच्या आयुष्यातील सर्वांचाच प्रामाणिकपणे आदर करत होती.   

सैफ अली खानची कन्या असलेल्या साराने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले होते. या चित्रपटानंतर सारा सिम्बामध्ये झळकली होती, तर सुशांत अभिषेक चौबे दिग्दर्शित सोनचिडीयामध्ये दिसला होता. 

Back to top button