तडका : आरोप आणि प्रत्यारोप | पुढारी

तडका : आरोप आणि प्रत्यारोप

कोणत्याही युद्धात शत्रूला मुख्यत: दोन ठिकाणी हरवावे लागते. प्रत्यक्ष रणांगणामध्ये युद्ध खेळले जाते तेव्हा आणि त्यापूर्वी युद्धाला सुरुवात होते तेव्हा. अशीच काहीशी परिस्थिती क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये असते. प्रत्यक्ष दौर्‍याला सुरुवात करण्यापूर्वी कर्णधार किंवा कोच अशी काही निवेदने करीत असतात, ज्यामुळे शत्रू पक्षाच्या मनात आधीच धडकी भरली पाहिजे. याचा अर्थ प्रत्यक्ष रणांगणात उतरण्यापूर्वी विरोधी पक्षाचे मनोधैर्य पूर्णपणे ढासळवून टाकणे महत्त्वाचे असते. इथे पण प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी शत्रूला हरवावे लागते. सध्या निवडणुकांच्या निमित्ताने जे राजकारण सुरू आहे, ते अशाच प्रकारचे आहे.

पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मतदान कोणाला झाले आहे, याची अद्याप माहिती कोणाकडेही असणे शक्य नाही; परंतु प्रत्येक जण मतदान आपल्याच पक्षाला झाले आहे आणि विरोधी पक्ष भुईसपाट झाल्यामुळे घाबरलेला आहे, असे एक प्रमेय मांडत आहे. तरुण वाचकांनी प्रमेय शब्दाचा अर्थ नाही समजला तर ‘नरेटिव्ह सेट’ करत आहेत, असा शब्द वापरावा म्हणजे त्यांना अचूक अर्थ समजेल. सध्या विरोधी पक्ष घाबरलेला आहे, त्यामुळे वाटेल ते आरोप करत आहे, असे एक ‘नरेटिव्ह सेट’ केले जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष हीच गोष्ट मांडत आहेत. खरे पाहता कोण भुईसपाट होणार आहे आणि कुणाच्या ध्वजाची पताका उंचावणार, हे 4 जूननंतरच कळेल; परंतु आजपासूनच वाटेल ते आरोप आणि अर्थातच आरोपांना उत्तर म्हणून प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

काही-काही पक्षांनी तर आपले विशिष्ट प्रवक्ते आरोप करण्यासाठीच राखून ठेवले आहेत की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. उदाहरणार्थ, परवापर्यंत जे आपले सहकारी होते आणि ज्यांचे कौतुक आपण दादा-दादा म्हणून करत होतो, त्यांनी निवडणुकीपूर्वी पार्टी बदलून नवीन घरोबा केल्यामुळे तेच दादा आज काही लोकांना खलनायक दिसायला लागले आहेत. वेळप्रसंग पाहून आणि आपली सहकारातील संस्थाने टिकून राहावीत म्हणून चार-पाच वर्षांपूर्वी ज्यांनी दुसर्‍या पक्षात प्रवेश केला, ते निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा स्वगृही परत येत आहेत. स्वगृही परत येण्यामध्ये फार मोठी रिस्क असते. आपण जो पक्ष सोडला आणि नेमका तोच भविष्यात सत्तेत आला तर पुढील आयुष्य मात्र जिकिरीचे होत असते.

संबंधित बातम्या

एकदा धोका दिल्यानंतर त्या व्यक्तीला पूर्णपणे नेस्तनाबूत करणे एवढेच आद्यकर्तव्य मूळ पक्षाकडे राहिलेले असते. तरी पण अशी रिस्क घेतली जाते आणि यालाच राजकारण असे म्हणतात. महाराष्ट्राचे नशीब तसे चांगले म्हणावे लागेल. फार-फार पूर्वी गावातील सरपंच किंवा सोसायटी चेअरमन यांना एकदा हाताशी धरले की, संपूर्ण गाव आपल्या ताब्यात येत असे. महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण अशा वाटाघाटी सरपंचाच्या माडीवर किंवा चेअरमनच्या बंगल्यावर केल्या जात असत. आज चित्र पूर्ण पालटलेले आहे. एका घरात जर सहा व्यक्ती असतील, तर ते सहाही जण एकाच पक्षाला मतदान करतील, अशी अजिबात शक्यता नाही. नव्याने सजग आणि सावध झालेली महिला शक्ती आज स्वतंत्रपणे मतदान करत आहे, त्यामुळे फार काही कुणी कुणाच्या ऐकण्यात राहिलेले आहे असे नाही. अशा आरोप आणि प्रत्यारोपांनी जनतेला काही फरक पडेल, असेही वाटत नाही.

Back to top button