तडका : नवे मतदार नवा मोह | पुढारी

तडका : नवे मतदार नवा मोह

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता वेग पकडत आहे. जवळपास सर्वच मतदारसंघांत कुणाची कुणाबरोबर लढत होणार आहे हे ठरल्यात जमा आहे. काही ठिकाणी प्रचाराचा नारळ फुटलेला असून, काही ठिकाणी उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. यानंतर साधारणतः 15 दिवसांत हा थरार टिपेला पोहोचेल आणि शेवटच्या काही दिवसांत हा रणसंग्राम निर्णायक स्थितीला येऊन थांबेल.
मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले पाहिजे यासाठी निवडणूक आयोग सातत्याने प्रचार करत असतो.

उमेदवारही त्यांच्यापरीने मतदारांनी मतदान करावे व ते आपल्यालाच करावे याद़ृष्टीने प्रचार यंत्रणा राबवत असतात. यासाठी मतदारांना अनेक प्रलोभने दाखवली जातात, आश्वासने दिली जातात. पाच वर्षांत काय करणार याचे चमकदार चित्र उभे केले जाते. या सर्वांपेक्षा मतदारांना आकर्षित करण्याचा एक नामी मार्ग नागपूर येथे निवडणूक आयोगाने अवलंबिला आहे.

मतदान केंद्र परिसरात जागोजागी सेल्फी पॉईंट उभे करण्यात येत आहेत. आजकाल जनता कुठेही गेली तरी लगेच फोटो काढत असते व ते फोटो समाजमाध्यमांवर तत्काळ टाकत असते. मतदानादिवशी तर मतदान करून आल्याबरोबर बोटावर असलेली मतदान केल्याची खूण दाखवणारे सेल्फी हजारो नव्हे, लाखोच्या संख्येने सोशल मीडियावर येत असतात. शिवाय त्यात प्रश्न विचारलेला असतो, ‘मी मतदान केले, तुम्ही केलेत का?’ म्हणजे मतदानासाठी जनजागृती करण्याचे काम जनताही करत असते, हे तुमच्या लक्षात येईल. काही ठिकाणी नवरा-बायको जोडीने मतदानाला जातात व मतदान करून बाहेर आल्यानंतर दोघे मिळून सेल्फी टाकतात. त्यांची तरुण मुले असतील तर तीही मतदान करून सेल्फी टाकतात.

संबंधित बातम्या

सेल्फी टाकण्याचा काही फायदा होवो न होवो; परंतु सेल्फी पॉईंट तयार करण्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. बदलत्या काळाबरोबर लोकांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंट उभे केले, तर तिथे जाऊन सेल्फी काढण्याच्या मोहासाठी का होईना, मतदानाचा टक्का वाढलेला दिसेल अशी शक्यता आहे. निवडणूक आयोगाला यावर्षी सर्वत्र किमान 75 टक्के मतदान झालेले पाहायला आवडणार आहे व त्यासाठी तसा प्रयत्न केला जात आहे.

पुढील पाच वर्षांत कुणी विकास करो अथवा न करो; परंतु मतदानाचा दिवस हा सेल्फी टाकून मिरवण्याचा दिवस आहे, हे मात्र नक्की. पर्यटनस्थळांवर आजकाल खूप गर्दी असते. ही गर्दी ते पर्यटनस्थळ पाहण्यासाठी असते की तिथे जाऊन आपण फोटो काढले किंवा सेल्फी काढली व ती सोशल मीडियावर टाकली यासाठी असते, हे कळायला मार्ग नाही. गाडीतून किंवा बसमधून उतरल्यानंतर एखाद्या तलावावर पर्यटक आले असतील तर तो तलाव पूर्ण पाहण्याच्या आधी सेल्फी काढण्याची लगबग असते. अगदी जंगलात फिरणारे लोकही वाघ दिसल्याबरोबर तो पूर्णपणे न पाहता आधी त्याचे शूटिंग घेतात. तुमच्या सफारी जीपच्या आजूबाजूने वाघ जात असेल तर त्याच्याबरोबर सेल्फी काढणारे महाभागही कमी नाहीत. वाघ दिसल्याचा आनंद होणे साहजिक आहे.

Back to top button