अस्थिरतेच्या भोवर्‍यात व्हिएतनाम | पुढारी

अस्थिरतेच्या भोवर्‍यात व्हिएतनाम

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांना वर्षभराच्या कामानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने राजीनामा देण्यास सांगितले. त्यांना अर्धचंद्र दिल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदी उपाध्यक्ष असलेल्या व्हो थी अन् झुआन या महिलेची घटनात्मक तरतुदीनुसार निवड करण्यात आली. आशिया खंडातील उभरती अर्थव्यवस्था म्हणून व्हिएतनामचा उदय होत असताना झालेल्या या राजकीय भूकंपामुळे आर्थिक विकासाला लगाम बसला आहे.

व्हिएतनाम प्राचीन भारताचा एक द़ृढ मित्र व भारतीय संस्कृतीची प्रभावछाया पडलेला देश; पण या व्हिएतनाममध्ये सध्या अस्थिरतेचे सावट पसरले आहे. एकेकाळी अमेरिकेशी शर्थीची झुंज देऊन हो चि मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली व्हिएतनामने संघर्ष करून स्वातंत्र्य मिळविले व प्रगतीचा मोठा टप्पा गाठला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून त्यांनी गनिमी काव्याचे युद्धतंत्र अनुसरले व अमेरिकेवर विजय मिळविला. हो चि मिन्ह यांनी अमेरिकेचे बॉम्ब हल्ले, हवाई हल्ले हे सारे पचवून या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. त्यांचे नाव हनोई या राजधानीच्या शहरास देण्यात आले आहे. या शहराला हो चि मिन्ह सिटी म्हणून ओळखले जाते. तेथे कम्युनिस्ट पक्षाची एकपक्षीय राजवट आहे खरी, पण व्हिएतनाम हो चि मिन्ह यांचा देश आज राहिला नाही.

व्हितएनाममधील कम्युनिस्ट पक्ष हा भ्रष्टाचाराने पोखरला आहे. दोन वर्षांच्या काळात दोन अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. दोन वर्षे सत्तेवर असलेले एक अध्यक्ष ट्रूओंग चिम भ्रष्टाचाराच्या भोवर्‍यात सापडले व त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर अगदी मागील आठवड्यात व्हिएतनामचे सत्तेवर असलेले अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे अखेर राजीनामा दिला व ते पायउतार झाले. आता व्हो थी अन् झुआन या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसर्‍यांदा कार्यभार सोपविला आहे. त्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत व्हिएतनामच्या प्रशासनाची धुरा सांभाळणार आहेत.

व्हिएतनामची राजकीय व्यवस्था साम्यवादी आहे. तेथे पक्षाचे अध्यक्ष, सरचिटणीस यांना महत्त्व असते. त्याच पद्धतीने दोन उपपंतप्रधान, एक कार्यकारी अध्यक्ष अशी रचना असते. सध्याचे सरचिटणीस गुयेन फू ट्रोंग (वय 79) हे मुरब्बी राजकारणी असून, सर्वात प्रभावी आहेत. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे तेच महानायक आहेत. 98 टक्के मते मिळवून अध्यक्ष झालेल्या थुआंग यांच्या प्रकरणी राष्ट्रीय महासभेने 88 टक्के विरोधी मत नोंदवून त्यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब केले. पक्षाचे अध्यक्ष हे देशाच्या कारभारावर लक्ष ठेवतात.

विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे पुढे काय होणार, असे अनेक नवे प्रश्न उभे राहिले आहेत. भविष्यात व्हिएतनामचे राजकारण कोणता आकार घेईल, तेथे स्थैर्य येईल का, विकास व प्रगतीचा नवा टप्पा गाठला जाईल का, असे अनेक प्रश्न उभे राहतात. तूर्त तरी हे राष्ट्र संकटात सापडले आहे. व्हिएतनामची सामाजिक व आर्थिक व्यवस्था पाहिली तर या साम्यवादी प्रधान देशात एकसंध राजकीय संस्कृती हे त्याचे वैशिष्ट्य आहे. या एकसंध राजकीय संस्कृतीत विकास चांगला होतो. लोकांना स्थैर्यही लाभते; परंतु अलीकडे चीनपासून सर्व साम्यवादी राष्ट्रांमध्ये भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. चीनमधला भ्रष्टाचार फारसा प्रकाशात येत नाही; परंतु सर्वच साम्यवादी राष्ट्रांमध्ये एकपक्षीय सत्ता असल्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असे असते आणि त्यामुळे भ्रष्टाचार वाढतो, असे म्हटले जाते.

व्हिएतनामचे तसे बरे आहे, कारण तेथील माध्यमे बर्‍यापैकी स्वतंत्र आहेत. तसेच लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही चांगल्यापैकी दिले जाते. त्यामुळे घडत असलेल्या घटना व घडामोडी प्रकाशामध्ये येतात, त्या चर्चेत येतात आणि त्यावर विचारमंथनही होते. व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने भ्रष्टाचाराविरोधात एक मोठी मोहीम हाती घेतली. गेल्या 2-3 वर्षांपासून पक्षाचे अध्यक्ष बारीकसारीक घटनांवर लक्ष ठेवतात व पक्षांतर्गत घडामोडींवर करडी नजर ठेवून भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधून काढतात. आधीच्या अध्यक्षांनी दोन वर्षांपूर्वी कोविड काळात केलेल्या गडबडी उजेडात आल्या आणि त्यांना पायउतार व्हावे लागले.

Back to top button