तडका : साता जन्माच्या गाठी..! | पुढारी

तडका : साता जन्माच्या गाठी..!

भारतीय माणसे जगभरात कुठे-कुठे अग्रेसर आहेत, याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर अवकाश तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, संगणक क्षेत्र आणि त्याचबरोबर लोकसंख्येत तर आपण अग्रेसर आहोतच. आणखी एक अत्यंत अभिमानाचा असा मुद्दा या ठिकाणी सांगत आहे आणि तो म्हणजे भारतीय लोकांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. जगभराचा विवाह टिकण्याबाबत सर्व्हे केला, त्यात केवळ एक टक्का भारतीय लोकांचे घटस्फोट होतात आणि त्या तुलनेमध्ये सर्वात जास्त घटस्फोट होणारा देश पोर्तुगाल आहे, ज्या ठिकाणी 94 टक्के लोकांचे घटस्फोट होतात. घटस्फोट होण्याच्या बाबतीत स्पेन दुसर्‍या क्रमांकावर (85 टक्के) आहे. युरोपियन देशांमध्ये साधारणत: 80 टक्के लोकांचे घटस्फोट होतात. रशियामध्ये 73 टक्के लोकांचे घटस्फोट होतात. सर्वसाधारणतः जगभर पाहिले तर 55 ते 70 टक्के असे घटस्फोटाचे प्रमाण आहे. आम्ही असा विचार केला की, भारतामध्ये घटस्फोट कमी होण्याचे कारण काय असेल?

आपल्याकडे विवाह झाला की, थेट सात जन्माच्या गाठी पडतात. एकदा गाठ पडली की, ती सात जन्मांची असते. शिवाय आपल्याकडील विवाहित महिलावर्ग हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून हरतालिका आणि तत्सम व्रते करून, तसेच इतरवेळी महादेवाची भक्ती करून पतीला बांधून ठेवतात. त्यामुळे कदाचित आपल्या देशात घटस्फोट होत नसतील. एखाद्या व्यक्तीचा घटस्फोट होतो म्हणजे त्याला तो शाप आहे की वरदान आहे, हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. हे सात जन्मांचे बुकिंग करणे आणि ते दरवर्षी रिन्यू करणे या कारणामुळे भारतामध्ये घटस्फोटांचे प्रमाण कमी असेल, असे वाटते. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा करार हरितालिका या स्वरूपात आणि उत्तर भारतामध्ये करवा चौथ या स्वरूपात आहे. ती गाठ अत्यंत मजबूत पद्धतीने बांधली जाते, त्यामुळे घटस्फोट होण्याचा फारसा विषय येत नाही.

आता दुसरा एक प्रश्न असा असतो की घटस्फोटाची वेळ कधी येते? पती-पत्नीला आपल्यातील मतभेद समजायला लागतात आणि त्यानंतरच घटस्फोट होत असतो. कदाचित, पोर्तुगालमध्ये ते 90 टक्क्यांवर आणि फ्रान्समध्ये 80 ते 85 टक्के आहे. भारतामध्ये हे प्रमाण अत्यंत कमी आहे, याचे आणखी एक कारण असे की, एकमेकांमधील मतभेद समजायच्या आतच त्या जोडप्याच्या पोटी दोन-तीन मुले जन्मलेली असतात. कदाचित, यामुळेच आपल्या देशात कमी घटस्फोट होत असतील.

बदलत्या जीवनशैलीनुसार माणसाच्या विचारात फरक पडताना दिसतो. बर्‍याच वेळा 25 ते 30 वर्षे संसार केल्यानंतरही अनेकांची नाती तुटताना दिसतात. आता एखाद्याला कोणत्याही वयात प्रेमात पडावेसे वाटते. मग त्यातून पत्नीबरोबरच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. काही वेळा महिलाही एखाद्यासोबत बरीच वर्षे संसार झाल्यानंतर एकमेकांच्या विचारांत एकवाक्यता नसल्याचे सांगत नाते तोडतात. विशेषतः हे प्रमाण उच्चभ्रू लोकांमध्ये अधिक दिसून येते. मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आपल्या परंपरा पाळत लग्नाच्या नात्यात कधीच दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाहीत. दैव योगाने आलेल्या सर्व जबाबदार्‍यांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत असतात.

Back to top button