तडका : भिरभिरणारे पतंग | पुढारी

तडका : भिरभिरणारे पतंग

लोकसभा निवडणूक अधिसूचना अवघ्या पंधरा दिवसांवर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात अनेक पतंग भरार्‍या मारताना दिसत आहेत. कोणता पतंग आपल्या मूळ दोराला सोडून कोणत्या मैदानात जाऊन पडेल याची काहीही शाश्वती नाही. सोलापूरच्या तरुण महिला आमदार यांनी आपण मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही, असा द़ृढ निश्चय जाहीर केला आहे. मोठा नेता असलेल्या वडिलांच्या वारसदार असलेल्या या कन्या कोणी कुठेही गेले, तरी मी काँग्रेस सोडणार नाही, असे म्हणत आहेत. त्याच वेळेला ज्येष्ठ नेते त्यांची पिताश्री भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. याचा काही केल्या मेळ बसत नाही.

कमालीचे अनिश्चिततेचे वातावरण असल्यामुळे आणि आपण काल काय बोललो हे सोयीस्करपणे विसरून वेगळी कृती करण्याचा कोडगेपणा अंगी भिनल्यामुळे कोण कुठे जाईल काही सांगता येत नाही. याबाबतीत दोन वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले गृहस्थ प्रामाणिक म्हणावे लागतील. आज हा पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि अगदी दुसर्‍याच दिवशी राज्यसभेची उमेदवारी मिळवून ते नवीन पक्षाकडून खासदार झाल्यात जमा आहेत.

एखाद्या संगणक अभियंत्याला किंवा नोकरी करणार्‍या कोणाही माणसाला जेवढी आपल्या भविष्याची काळजी असते त्यापेक्षाही जास्त काळजी राजकारणी लोकांना असते. हे भविष्य म्हणजे त्यांचे स्वतःचे भविष्य आणि त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य इतकाच त्याचा मर्यादित अर्थ असतो. खरं तर, निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्याकडे किती संपत्ती आहे, याचा तपशील जाहीर केला जातो. तो पाहिला तर आपल्यासारख्या सामान्य लोकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते. पुढच्या सात पिढ्या कोणीही काहीही नाही केले, तरीही त्यांचा उदरनिर्वाह आरामात होईल इतकी संपत्ती एका राजकीय नेत्याने आपल्या आयुष्यात जमा केलेली असते, तरी पण त्यांना आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची एवढी काय काळजी वाटत असेल?

संबंधित बातम्या

आपण सामान्य माणसे आपल्या आयुष्यामध्ये मुलाबाळांचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि स्वतःचे घर बांधणे यामध्येच समाधानी असतो. राजकीय लोकांचे असे नसते. आधी नगरसेवक, पुढे नगराध्यक्ष, त्यानंतर आमदारकी, आमदारकी मिळाली तर मंत्रिपद, नाही आमदारकीला जागा मिळाली तर थेट खासदारकी, त्यानंतर केंद्रात मंत्रिपद अशा चढत्या क्रमाने महत्त्वाकांक्षा असतात आणि त्याला अंत नसतो आणि हे सगळे जनतेच्या सेवेसाठी चाललेले असते.

व्यक्तिगत जमा केलेली करोडो रुपयांची संपत्ती हीसुद्धा जनतेसाठीच केलेली असावी बहुतेक. सद्यस्थितीत चलनवलन वाढलेले असल्यामुळे पक्ष सोडणे आणि नवीन पक्षात प्रवेश करणे हे दररोज पाहायला मिळणार आहे. आता सुज्ञ मतदारांचा या दलबदलू नेत्यांवर भरवसा राहिलेला नाही. कधी कोण कोणत्या पक्षात जाईल याची शाश्वती राहिलेली नाही. आयाराम आणि गयारामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. केवळ पदासाठी राजकीय निष्ठा या लोकांनी खुंटीला टांगली आहे. राजकारण्यांनी या लोकशाहीची थट्टा उडवली आहे, हेसुद्धा तितकेच खरे आहे.

Back to top button