तडका : दोन अधिक दोन..! | पुढारी

तडका : दोन अधिक दोन..!

धडधाकट असलेल्या व्यक्ती तडकाफडकी दगावण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे, याबद्दल नुकतीच डॉक्टर लोकांच्या राष्ट्रीय परिषदेत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. असे म्हणतात की, जीवशास्त्रात 2 अधिक 2 म्हणजे 4 होतील, याची काहीही खात्री नसते. माणसाचा जीव हा जीवशास्त्राचाच एक भाग आहे. त्यामुळे कोणतेही ठोकताळे जीवाच्या आरोग्याबद्दल, व्याधींबद्दल आणि मृत्यूबद्दल ठामपणे मांडता येत नाहीत. त्यामुळेच आपल्या आसपास घडणार्‍या घटना आपल्याला धक्का आणि अनेकांना धक्के देऊन जातात. उदाहरणार्थ, एखादी आजी आजोबांसहित गावाकडे राहत असते. नातवंडे, पतवंडे, मुले आणि तिच्या सुना या सर्वांची ती लाडकी असते; पण ही सगळी मंडळी पुण्यात किंवा मुंबईत वास्तव्याला असतात.

तर होते काय की, आजी सिरियस असल्याचा मेसेज व्हॉटस्अ‍ॅपच्या ग्रुपवर येऊन धडकतो. फोनाफोनी सुरू होते. ‘आजी अ‍ॅडमिट असून, तिला हार्ट अ‍ॅटॅक आला आहे आणि डॉक्टरांनी सर्व नातेवाईकांना बोलावून घेण्यास सांगितले आहे,’ ही बातमी वार्‍यासारखी पसरते. फार तर चोवीस तास राहिलेत, असे सांगणारे डॉक्टर हे सहसा डोनेशन देऊन मॅनेजमेंट कोट्यातून शिकलेले असतात का, याचा शोध घेतला पाहिजे. मग आजीच्या भेटीला जाण्याचे नियोजन सुरू होते. गाड्या काढल्या जातात, कुणी किरायाने गाड्या बोलावतात आणि अवघ्या तासाभरात मंडळी कुणी पुणे, कुणी मुंबई किंवा इतरत्र असतील तिथून गावाकडे मार्गस्थ होतात.

प्रवासात आजी किती प्रेमळ होती/आहे किंवा माझ्यावर तिचा किती जीव आहे, याच्या आठवणी काढल्या जातात. काही सुनांच्या तर डोळ्यांचे पाणी खंडत नसते आणि अश्रूभरल्या डोळ्यांनीच त्या प्रवास करतात. आजीशी शेवटचे बोलणे तरी होईल की नाही, याविषयी चर्चा होत राहते. एकदाचे आठ-दहा तास रात्रभर प्रवास करून धास्तावलेल्या मनाने मंडळी गावाकडील घराच्या दारात पोहोचतात. आजी जिवंत दिसेल की नाही, ही शंका घेऊन सगळे घरात प्रवेश करून आजीच्या खोलीकडे धाव घेतात. आजीचा कृश देह निपचित पडलेला असेल, असे प्रत्येकाने गृहीत धरलेले असते. आतील द़ृश्य अचंबित करणारे असते. आजी पलंगावर बसलेली असते आणि सगळ्यांकडे पाहत मुटूमुटू गरम, वाफाळलेला उपमा खात असते. याचे कारण म्हणजे तेच ते, ‘इन बायोलॉजी टू प्लस टू इज नेव्हर फोर.’ म्हणजे मशीन असेल तर त्याला सगळे नियम लागू पडतात. जीवासाठी असे नियम नसतात.

संबंधित बातम्या

याच्या उलट दुसरा प्रकार असतो. ‘परवाच फोनवर तासभर बोलले माझ्याशी आणि आज बातमी आली गेले म्हणून’ किंवा ‘अरे, परवाचे काय घेऊन बसलास, काल मॉर्निंग वॉकला सोबत होते आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही,’ असेही घडते, याचे कारण म्हणजे तेच ते, ‘इन बायोलॉजी टू प्लस टू इज नेव्हर फोर.’ धडधाकट आणि पुढील दहा वर्षांचे नियोजन करणारी तरुण व्यक्ती पुढील दहा तासांत जगाचा निरोप घेते आणि आयुष्याला कंटाळलेली पंचाण्णव वर्षांची व्यक्ती नाही नाही म्हणत अजून तीन-चार वर्षे काढते. याचे परमेश्वराचे नियोजन मात्र बहुधा वेगळेच असावे, असे दिसते.

Back to top button