तडका : विवेकबुद्धी आणि माणूस | पुढारी

तडका : विवेकबुद्धी आणि माणूस

माणसाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काही समस्या उद्भवल्या की तो पार गांगरून जातो. आपल्यासारखी सामान्य माणसे देवाचा धावा करायला लागतात. त्याचाही फारसा उपयोग झाला नाही आणि संकटावर संकटे पाठोपाठ यायला लागली तर एखादा नवस करण्याचे राहून गेले आहे काय किंवा वास्तूमध्ये काही दोष निर्माण होऊन त्याची शांती करणे आवश्यक आहे काय, असे विचार मनात येतात. संकटे दूर राहावीत म्हणून वास्तुपूजा वास्तुशांती आणि काही प्रकारचे यज्ञ ही केली जातात. विशेषत: वास्तुदोष शोधून संकटे दूर ठेवण्यावर भर असतो. एखाद्या पोलिस ठाण्याला किंवा थोडक्यात म्हणजे तेथील प्रभारी पोलिस अधिकार्‍याला वारंवार आपल्या परिसरात घडणारे गुन्हे आणि गंभीर अपघात पाहता पोलिस ठाण्यामध्ये शांती करावी वाटली तर त्यात काय चुकले असा आमचा बिनतोड सवाल आहे.

घडले असे की लातूर जिल्ह्यातील उदगीर भागातील एका ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अपघात घडायला लागले, गंभीर गुन्ह्यांची नोंद व्हायला लागली. साहजिकच वरिष्ठांनी गतवर्षीपेक्षा गुन्ह्यांचे आणि अपघातांचे प्रमाण का वाढले आहे, अशी विचारणा सदरील पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना केली असेल. असे प्रकार वारंवार घडू नयेत म्हणून त्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले असतील, पण त्याला यश येईनासे झाले. सहसा वरिष्ठ अधिकारी आपल्या कार्यालयातील सेवक, चालक किंवा तत्सम मंडळींच्या बरोबर मोकळेपणाने बोलत असतात. कदाचित अशा एखाद्या व्यक्तीने अधिकारी महोदयांना, ‘साहेब पोलिस ठाण्याची शांती करून घ्या, सगळे प्रश्न सुटतील’ अशी खात्री दिली असावी. हा सल्ला पटल्यामुळे म्हणा किंवा कसेही, बोकड कापून शांती करण्याचा प्रस्ताव समोर आला आणि रीतसर तशी शांती केली गेली.

पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घातले जाते आहे हे लोकांना रुचणारे नव्हते. पोलिस अधिकारी महोदयांनी एक बोकड आणला आणि चक्क पोलिस ठाण्याच्या इमारतीसमोरच कापून वास्तूचा होवो किंवा न होवो, पण बोकडाचा जीव शांत केला. रीतसर पद्धतीने बोकडाचा बळी पोलिस ठाण्याच्या आवारात दिल्यानंतर, दिल्यानंतर म्हणण्यापेक्षा घेतल्यानंतर सदरील बोकड हा जवळच असलेल्या एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर नेण्यात आला आणि तिथे त्याचे मटण चविष्ट पद्धतीने शिजवून त्याचा आस्वाद असंख्य लोकांनी घेतला.

संबंधित बातम्या

भारतात कुठेही कोणतीही घटना आजकाल घडत असेल तर हातात मोबाईल असलेले लोक फोटो काढायला सज्ज असतातच. बोकड पोलिस ठाण्याच्या समोर कापतानाचे फोटो कोणीतरी काढले आणि ते चक्क पुढील दोन दिवसांत मीडिया, वर्तमानपत्रे आणि सर्वत्र व्हायरल झाले. साहजिकच वरिष्ठांनी याची दखल घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणारे गंभीर अपघात कमी होतील का किंवा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल का? हे पुढचे विषय आहेत. तूर्त बें बें ओरडणारे एक बोकड शांत झाले आहे आणि हे बोकड शिजवून आणि रिचवून असंख्य लोकांचे पोटही शांत झाले आहे. शेवटी काही ना काही तरी शांत होणे महत्त्वाचे होते तेवढा उद्देश मात्र सफल झालेला दिसतो.

Back to top button