भाजपचे लक्ष्य आणि वास्तव | पुढारी

भाजपचे लक्ष्य आणि वास्तव

डॉ. जयदेवी पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघात घालतानाच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे लक्ष्यही जाहीर केले. 370 जागांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपला दक्षिणेसह काही राज्यांमध्ये अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. कसे आहे आकड्यांचे समीकरण?
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघात घालतानाच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे लक्ष्यही जाहीर केले. त्यानुसार भाजपला या निवडणुकांमध्ये 370 जागांवर विजय मिळेल आणि एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. भारताचा वेगवान अर्थिक विकास, लाभार्थीपर्यंत पोहोचलेले योजनांचे लाभ, जागतिक पटलावर वधारलेली भारताची प्रतिमा, अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा, नितीशकुमारांचा एनडीए प्रवेश, इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा ‘एकला चलो रे’चा नारा, ही राजकीय स्थिती पंतप्रधानांच्या उद्दिष्टांमागे असल्याचे दिसते. पण तरीही 370 जागांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपला दक्षिणेसह काही राज्यांमध्ये अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. कसे आहे सध्याचे आकड्यांचे समीकरण?

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रत्युत्तर प्रस्तावात आपल्या भाषणात बोलताना पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीतील जागांचे लक्ष्य समोर ठेवले. त्यानुसार एनडीएला 400 पेक्षा जास्त आणि भाजपला 370 जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. यानंतर देशभरातील राजकीय निरीक्षकांकडून भाजपच्या या आकड्यामागच्या राजकीय गणिताचे आकलन केले जात आहे. 2009, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता 95 जागा अशा आहेत, ज्या जागांवर मागील तीनही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप विजयी झाला आहे. याउलट काँग्रेससाठी असे संपूर्ण देशातील केवळ 17 मतदारसंघ आहेत. 2014 आणि 2019 मध्ये भाजपने जिंकलेल्या 173 जागा आणि काँग्रेसच्या 34 जागा, या दोन्ही पक्षांच्या बालेकिल्ला मानल्या जातात. याउलट 199 जागा अशा आहेत, ज्याठिकाणी भाजपला गत तीन निवडणुकांपैकी एकाही निवडणुकीत एकही निवडणूक जिंकता आलेली नाही आणि 309 जागा अशा आहेत, ज्यावर काँग्रेसला एकही निवडणूक जिंकता आली नाही. याशिवाय 76 जागा अशा आहेत, जिथे या तीनपैकी एका निवडणुकीत भाजप विजयी झाली आहे. काँग्रेसच्या खात्यात अशा जागांची संख्या 183 आहे.

2019 च्या निवडणुकीत भाजपने 435 जागांवर उमेदवार उभे केले आणि 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवत 224 जागा जिंकल्या. 2014 मध्ये हा आकडा 136 होता. म्हणजे 2019 मध्ये भाजपच्या 88 जागांची वाढ झाली. हा आकडा आणखी वाढेल, असा दावा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला. याचा अर्थ भाजप 224 जागांवर मागील विजयाची पुनरावृत्ती करेल, असे गृहीत धरले आहे.

भाजपला 224 जागा जिंकण्याचा विश्वास असला तरी 370 चा आकडा अजून दूर आहे. यासाठी आणखी एक ट्रेंड पाहू. 2019 मध्ये भाजपने 75 टक्के म्हणजे 210 जागा एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. याखेरीज फक्त 10 जागा अशा होत्या, जिथे भाजपचे उमेदवार 10 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. सुमारे 30 जागांवर 10 ते 50 हजार मतांच्या फरकाने भाजप उमेदवारांनी विजय मिळवला. जास्त मताधिक्क्याने मिळवलेल्या जागा यंदाच्या निवडणुकीतही हाताशी राहू शकतील आणि त्यात आणखी 67 जागांची भर पडेल, असे सद्य:स्थिती दर्शवते. तथापि, 72 जागांवर भाजपच्या मतांची टक्केवारी 5 टक्क्यांनी वाढली आणि विरोधकांची मते कमी झाल्यास 38 टक्के जागा वाढू शकतात, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.

विशेषतः सहा राज्यांमध्ये चांगल्या कामगिरीचा फायदा होऊ शकतो. पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये पक्षाची कामगिरी चांगली राहिल्यास भाजपला 370 चा आकडा गाठणे सोपे ठरू शकते; मात्र महाराष्ट्र आणि बिहारमध्ये परिस्थिती बदलली आहे. 2019 मध्ये शिवसेना भाजपसोबत होती; पण यावेळी शिवसेना शिंदे गट आणि उद्धव गटात विभागली गेली आहे. याचा फायदा होणार की नुकसान, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तीच स्थिती बिहारबाबत आहे. बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत आले असले तरी लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे पक्षापासून फारकत घेतली होती आणि नंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडी स्थापन केली, त्याबाबत जनतेचे मत काय आहे, हे आगामी लोकसभा निवडणुकांमधून दिसून येईल. बिहारमध्ये 40 पैकी 39 जागा जिंकण्याच्या कामगिरीची पुनरावृत्ती भाजप करू शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महाराष्ट्र आणि बिहार या सहांपैकी दोन राज्यांमध्ये जुना ट्रेंड कायम राहिला किंवा वाढला आणि पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पक्षाने चांगली कामगिरी केली, तर भाजप 370 चा आकडा गाठू शकतो.

राजकारणात कोणतीही परिस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे एनडीए 400 पार करू शकत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण भाजपला यासाठी दक्षिणेकडील राज्यांमध्ये आपली स्थिती लक्षणीयरीत्या सुधारावी लागेल, असे दिसते. सध्या केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांत लोकसभेच्या 118 जागा असून; यापैकी भाजपकडे फक्त चार जागा आहेत, त्याही सर्व तेलंगणातील आहेत. सध्याच्या राजकारणाचा एकंदर प्रवाह पाहता येणार्‍या काळात कोणत्याही घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजप आघाडीत आणखी कोणते पक्ष सहभागी होतात का, देशपातळीवर काही महत्त्वाच्या घडामोडी घडतात का, प्रत्यक्ष जागावाटपानंतर बंडखोरांची स्थिती काय राहील, यांसारख्या अनेक मुद्द्यांचा विचारही महत्त्वाचा आहे.

Back to top button