मुत्सद्दी राजकारणी किसिंजर | पुढारी

मुत्सद्दी राजकारणी किसिंजर

संजीव ओक

अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आखणारे मुत्सद्दी म्हणून ज्यांचा लौकिक होता, ते अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री तसेच नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. तथापि, भारताविरोधात उघड भूमिका घेणारा अमेरिकी मुत्सद्दी हीच त्यांची ओळख भारतीयांना स्मरणात राहील.

किसिंजर सुप्रसिद्ध अमेरिकन मुत्सद्दी तसेच राजकारणी. शीतयुद्धाच्या काळात जागतिक घडामोडी घडवण्यात किसिंजर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अनेक आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने यांच्यात त्यांचा असलेला सहभाग त्यांना प्रसिद्धी देण्याबरोबरच त्यांच्यावर टीका करणाराही ठरला. एक मुत्सद्दी म्हणून त्यांचे स्वागत केले गेले, तर इतरांनी त्यांच्या या कृतीचा लोकशाहीच्या द़ृष्टीने अस्थिर तसेच हानिकारक म्हणून निषेध केला. जगभरातील सरकार अस्थिर करण्यात असलेली त्यांची भूमिका हुकूमशाही शासनांना पाठिंबा देण्यास कारणीभूत ठरली. राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि फोर्ड यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच परराष्ट्र सचिव या त्यांच्या कार्यकाळात किसिंजर यांनी अमेरिकेला सोव्हिएत युनियनच्या दबावाविरोधात काम करू शकणार्‍या देशांसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. मात्र, ज्या देशांशी अमेरिकेने मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले, त्या देशांमध्ये मानवाधिकारांची गळचेपी होत होती, त्याकडे हेतूतः दुर्लक्ष केले गेले. चीन हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण ठरावे.

किसिंजर हे भारतासोबतच्या त्यांच्या गुंतागुंतीच्या संबंधासाठीच प्रामुख्याने ओळखले जातील. 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान किसिंजर यांनी घेतलेली भूमिका भारताच्या विरोधात जाणारी होती. अमेरिकेतील सर्वसामान्यांचे मत भारताच्या बाजूने असतानाही, त्यांनी पाकिस्तानला दिलेले समर्थन अनाकलनीय असेच ठरले. इथेही प्रादेशिक संतुलन राखण्यासाठी किसिंजर यांनी पाकला बळ दिले, असे म्हटले गेले. भारताच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी तसेच पाक नेत्यांशी त्यांची असलेली जवळीक, त्यांना हा निर्णय घेण्यास भाग घेणारी ठरली. राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून किसिंजर यांच्या कार्यकाळात दक्षिण आशियातील सत्ता संतुलन राखण्यासाठी पाकला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे, असे धोरण आखले गेले. म्हणूनच भारताच्या वाढत्या लष्करी तसेच आर्थिक सामर्थ्याकडे प्रदेशाच्या स्थिरतेसाठी असलेला संभाव्य धोका म्हणूनच किसिंजर यांनी पाहिले.

भारताविषयी त्यांचे मत अगदी वेगळे असे होते. भारताच्या लोकशाही परंपरा तसेच प्रदेशातील प्रमुख शक्ती म्हणून असलेल्या क्षमतांचे त्यांनी कौतुक केले असले, तरी भारताची आण्विक महत्त्वाकांक्षा तसेच सोव्हिएत युनियनशी असलेल्या घनिष्ठ संबंधांबद्दल त्यांना चिंता होती. 2008 मध्ये अमेरिकेने भारताबरोबर ऐतिहासिक नागरी आण्विक करार केला. ज्यामुळे नागरी उद्देशांसाठी आण्विक तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणास परवानगी मिळाली. प्रारंभी या कराराला विरोध करणार्‍या किसिंजर यांनीच भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्याची गरज मान्य केली. शीतयुद्धाच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. 1971 मध्ये अमेरिकेला उघडपणे पाकची बाजू घेण्यास भाग पाडणार्‍या किसिंजर यांना 1972 मध्ये भारताबद्दलच्या धोरणात बदल घडलेला पाहावा लागला. इतकेच नव्हे, तर भारत-पाक सिमला करारात त्यांनी मध्यस्थी केली.

जगभरातील सरकारे अस्थिर करण्यात किसिंजर यांचा मोठा हात होता. 1973 चे चिलीतील सत्तांतर हे त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरावे. साल्वाडोर अलेंडे यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले समाजवादी सरकार बंडाळी घडवून उलथवून टाकले. ऑगस्टो पिनोशे यांच्या नेतृत्वाखालील लष्करी हुकूमशाही तेथे स्थापन झाली. व्हिएतनाम तसेच कंबोडिया येथे किसिंजर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे लोकशाही मूल्यांप्रती त्यांना आदरभाव आहे का, असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. इराणच्या शाह या दडपशाही राजाला पाठिंबा दिल्याने, त्यांची प्रतिष्ठा खालावली. किसिंजर यांच्या धोरणात्मक कुशाग्र बुद्धिमत्तेची तसेच जागतिक स्थिरतेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची त्यांचे समर्थक प्रशंसा करतील. तर हुकूमशाही राजवटींना पाठबळ देणारा, लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार अस्थिर करणारा धोरणी म्हणून त्यांच्या भूमिकेचा निषेध केला जाईल.

Back to top button