लवंगी मिरची : स्वच्छ हवेचा श्वास हवा! | पुढारी

लवंगी मिरची : स्वच्छ हवेचा श्वास हवा!

यावर्षीची दिवाळी पहाट ही दिवे, फटाके, फराळाचे पदार्थ घेऊन आली आहेच, सोबत भरपूर प्रदूषण घेऊन आली आहे. मुंबई, दिल्ली आणि पुणे या तीन शहरांची हवा श्वास घेण्यालायक राहिलेली नाही, असा अहवाल आलेला आहे. हिवाळ्यात आधीच थोडेसे धुके असते. त्यामुळे शहराभोवती दाट ढगांचा थर असतो. त्यात धूलिकण जमा होतात आणि मग ती हवा प्रदूषित होऊन जाते. विशेषत: मुंबईमधील हवा वाढत्या बांधकामामुळे प्रदूषित झाली आहे, असे निदर्शनास आले आहे. बांधकाम करणारे लोक कोण असतात याचा एकदा शोध घेतला पाहिजे.

फार मोठा श्रीमंत माणूस नसेल, तर सामान्य माणसाला मुंबईमध्ये प्लॉट घेऊन घर बांधणे अशक्य असते. स्वतःचे छोटेसे का होईना घर असावे, असे स्वप्न सामान्य माणसे मुंबई, दिल्ली, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी पाहूसुद्धा शकत नाहीत, इतके जागांचे भाव वाढलेले आहेत. मग, हे बांधकाम करणारे बहुतांश वेळेला बिल्डर लोक असतात. तीस चाळीस मजली इमारतींचे बांधकाम चार-पाच वर्षे चालते. त्या बांधकामावर येणारे सिमेंट, विटांचे तुकडे आणि उडणारी धूळ ही हवा प्रदूषित करत असते. हे प्रदूषण यावर्षी जरा जास्तच झाले म्हणून त्याची ओरड आहे.

दिल्लीतील प्रदूषणाचे वेगळेच कारण आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यांमध्ये जी पिके घेतली जातात. त्याचा उरलेला कचरा जाळला जातो आणि मग तो धूर दिल्लीला वेढून टाकतो. शहर कोणतेही असले, तरी सर्वात महत्त्वाचा आणखी एक भाग असतो आणि तो म्हणजे वाहने. जेवढा वेळ वाहन सुरू असते तेवढा वेळ ते धूर फेकत असते. शहरांमध्येसुद्धा आता माणशी दोन, चारचाकी गाड्या असे प्रमाण झाले आहे. दुचाकी आणि चारचाकी गाड्या, मालवाहू ट्रक, ट्रॅव्हल्स, बसेस यांची शहराच्या दिशेने अखंड रहदारी सुरू असते. हे प्रत्येक वाहन आपापल्या परीने धूर फेकत असते आणि या धुरामुळे प्रदूषण सातत्याने वाढत जात असते. आता अशा प्रदूषित शहरांमध्ये राहणार्‍या सामान्य लोकांनी करायचे काय? ना त्यांच्याकडे हिल स्टेशनला राहायला जाण्याचे पैसे असतात, ना ते स्वतःचे घर सोडून इतरत्र जाऊ शकतात. दिवाळीसारखा सण आला असताना आपले घर सोडून कोण कशाला जाईल? पण, लवकरच ती वेळ येणार आहे, असे दिसते.

संबंधित बातम्या

इतक्या प्रदूषित शहरांमध्ये राहताना जसे एमएनजीएल किंवा सिलिंडरमध्ये एलपीजी गॅस आणला जातो तसे ऑक्सिजनचे सिलिंडर खरेदी करण्याची वेळ आली आहे की काय, अशी भीती वाटते. म्हणजे लोक उद्या व्यवसायासाठी, नोकरीसाठी, रोजगारासाठी बाहेर पडतील. संध्याकाळी काम संपल्यानंतर धावत परत घरी पोहोचल्यानंतर पहिले काम म्हणजे ऑक्सिजन सिलिंडरला जोडलेला मास्क स्वतःच्या नाकावर बसवून घेतील तेव्हा कुठे त्यांना शुद्ध हवेचा श्वास घेता येईल. फार पूर्वी कोणी उद्या भविष्यात पाणी विकत घ्यायला लागेल असे म्हटले, तर त्याला लोक वेड्यात काढत असत. कारण, पाणी अत्यंत मुबलक होते आणि त्या मानाने लोकसंख्या कमी होती. तशीच परिस्थिती उद्या चालून श्वसनासाठी ऑक्सिजन विकत घेण्याची आली, तर आश्चर्य वाटू देऊ नका.

शासन आपल्या परीने प्रयत्न करत असते. उदा. दिल्लीमध्ये गाडीच्या नंबरप्रमाणे विशिष्ट दिवशी सम आणि विषम नंबरच्या गाड्या सोडण्याची तरतूद केलेली आहे. पहिल्यांदा जेव्हा सम आणि विषम नंबरला महत्त्व आले तेव्हा लोकांनी आपल्याकडे सम क्रमांकाची गाडी असेल, तर दुसरी गाडी घेताना विषम क्रमांकाची गाडी घेतली आणि विषम क्रमांकाची गाडी असेल, तर दुसरी गाडी घेताना सम क्रमांकाची गाडी घेतली. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही रस्त्यावर येणारच.

Back to top button